मुंबई : जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पाणथळ क्षेत्राला दिवसेंदिवस प्लास्टिक कचऱ्याचा विळखा पडत आहे. दरवर्षी प्लास्टिकचा लाखो टन कचरा जमा होत असल्यामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राड्यारोड्याचा भराव, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे, अतिक्रमणे ही पाणथळ क्षेत्र नष्ट होण्याची कारणे असली तरी पाणथळ क्षेत्रात होणारे प्लास्टिक प्रदूषण ही याहीपेक्षा एक गंभीर समस्या असल्याचे ‘वेटलॅण्ड इंटरनॅशनल साऊथ एशिया’ या संस्थेने त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे.
पाणथळ क्षेत्रात दरवर्षी प्लास्टिकचा लाखो टन कचरा जमा होत असल्याचे तसेच भारतात जंगलांपेक्षा पाणथळ क्षेत्र तीन पट वेगाने नष्ट होत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. तेथील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक कचऱ्यामुळे केवळ जिवांचाच नव्हे, तर पाण्याच्या नैसर्गिक वहन प्रणालीवरही विपरीत परिणाम होतो. जलप्रवाह अडवल्याने पुराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरवर्षी जगभरातून सुमारे ८० लाख टन प्लास्टिक कचरा समुद्रात आणि पाणथळ क्षेत्रात पोहोचतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये समुद्रकिनारे, नाले, तलाव आणि खाडी परिसर प्लास्टिकच्या विळख्यात सापडले आहेत.
नवी मुंबईतील एनआरआय तलाव, ठाण्याचा खाडी परिसर, तसेच मालाड व गोरेगावमधील नाल्यांतून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक गोळा होत असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते सांगतात. त्याचबरोबर टी. एस चाणक्य परिसर हा सध्या फ्लेमिंगोमुळे गजबजलेला असतो. मात्र, तेथे हीच परिस्थिती आहे. संपूर्ण परिसरात प्लास्टिक कचरा निर्माण झालेला असतो. २०२३ मध्येच मुंबई महापालिकेने २,१०० टनांहून अधिक प्लास्टिक कचरा केवळ समुद्रकिनाऱ्यांवरून उचलल्याची नोंद करण्यात आली आहे.
जगातील ४० टक्के प्रजातींचा अधिवास
पाणथळ क्षेत्रात जगातील ४० टक्के प्रजातीचा अधिवास आहे. या समृद्ध परिसंस्थांमध्ये विविध वनस्पती, पक्षी, मासे आणि इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. पाणथळ जागांचे संरक्षण केल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होते. पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित घटक शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. कांदळवनांतील वनस्पती निसर्गात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भाताची शेते सर्वात मोठी पाणथळ क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. समुद्रकिनारी असलेल्या पाणथळ जमिनीमुळे किनाऱ्यांची धूप थांबते.
प्लास्टिक प्रदूषण हा गंभीर मुद्दा आहे. सरकारबरोबरच नागरिकांनीही प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलली पाहिजेत. आताच याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. – धर्मेश बराई, पर्यावरणप्रेमी, संस्थापक, एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन