मुंबई : जन्मजात हातापायाची बोट चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करणे खर्चिक असते. मात्र ठाणे जिल्हा रुग्णालयात आता अशा शस्त्रक्रिया होत असून, रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीवर यशस्वी प्लॅस्टिक सर्जरी करण्याता आली या शस्त्रक्रियेमुळे तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत.
भिवंडी परिसरात राहणारी अंजू (नाव बदलले आहे) ही मुलगी सहा वर्षांची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूच बोटं आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतःच चिकटलेली होती. त्यामुळे तीला लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या साध्या हालचाली करतानाही अनेक अडचणी येत होत्या. तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता.
अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. अंजूच्या पालकांनी ठाण्यातील जिल्हा रुग्णालयाचा पर्याय निवडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांनी त्यांना लगेच सर्व सहकार्य केले त्यानंतर अंजूच्या डाव्या हातावर प्लॅस्टिक सर्जन डॉ.अभिषेक धाकड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
साधारणपणे तासभराच्या शस्त्रक्रिोनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोटं वेगळी करण्यात यश आले. मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली असून डॉक्टरांनी सांगितले की, पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णतः कार्यक्षम होतील. या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे आदींनीअथक परिश्रम घेतले.
सामान्यतः अशा प्लॅस्टिक सर्जरी खासगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च येतो. त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे अशा उपचारांपासून वंचित राहतात. पण आता सिव्हिल रुग्णालयांमध्येही अशा जटिल व खर्चिक सर्जरी मोफत होऊ लागल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
अंजूचा दुसरा हात व पायाची बोटही अशाच प्रकारे चिकटलेली आहेत. पहिल्या टप्प्यात डाव्या हाताची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर, उर्वरित बोटांवर पुढील टप्प्यांमध्ये उपचार केले जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड यांनी सांगितले.
सामान्यता खाजगी रुग्णालये वगळता शासनाच्या तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. मात्र ठाणे जिल्हा रुग्णालयाने प्लास्टिक सर्जरीची गरज ओळखून या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पालकांनी रुग्णालय व डॉक्टरांचे आभार मानले.