मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला संकुलातील नीता अंबानी कल्चरल सेंटरमधील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाची बनावट ओळख दाखवून घुसू पाहणाऱ्या दोन तरुणांना काल ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाचे नाव रोहन पारिख असून तो २४ वर्षांचा असल्याचे कळते. त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून वावरणाऱ्या तरुणाकडे बंदूक आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रोहन पारिख व त्यांच्यासोबत असलेल्या तरुणाची कसून चौकशी सुरु आहे. रोहनचे छायाचित्र असलेले पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र होते. मात्र ते बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाचे विशेष पथक या प्रकरणी दोन्ही तरुणांची चौकशी करीत आहे .

आपण पंतप्रधान कार्यालयातील आहोत, असे सांगून रोहन पारिख कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी सोमवारी संध्याकाळी शिरू पाहत होता. परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत सतर्क असलेल्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच मुंबई पोलिसांनी त्याला तसे करु न देता त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत अंगरक्षक असल्याचेही निष्पन्न झाले. कथित अंगरक्षकाकडे सापडलेली बंदूक परवानाधारक होती किंवा नाही, याची पुष्टी मिळू शकलेली नाही. ही बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रोहनने बनावट ओळखपत्र का बनवले, तसेच शस्त्रधारी अंगरक्षक सोबत का आणला होता, या सर्व बाबांमुळे त्याचा कसून चौकशी केली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्या मुंबईतील ठिकाणाहून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एका व्यक्तीकडे बंदूक सापडली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे वय २४ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यासोबत एक अंगरक्षकही होता, ज्याच्याकडे बंदूक होती. आता मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती काल एका बनावट ओळखपत्राचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. मुंबई पोलिसांनी त्याला हटकले आणि तपासणी केली असता, त्याच्याकडील ओळखपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर, बीकेसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे:

संशयास्पद सरकारी ओळखपत्राचा वापर करून आणि बंदुकीसारखे शस्त्र बाळगून, तीन व्यक्तींनी बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’मध्ये सुरक्षारक्षकांना चकवून बळजबरीने प्रवेश केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात सरकारी अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र धारण करणे आणि शस्त्र बाळगून बेकायदेशीर प्रवेश करणे आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शस्त्र परवानाधारक असल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. ही घटना काल घडली होती आणि पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याशी या घटनेचा कोणताही संबंध नाही – राजतिलक रोशन, उपायुक्त, मुंबई पोलीस