मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान कार्यालयाचे खोटे ओळखपत्र दाखवून रिव्हॉल्व्हरसह प्रवेश केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २४ वर्षे तरुणाचीच फसवणूक झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.

खार येथे राहणारा रोहन पारिख हा मुळात शेअर ब्रोकर आहे. लंडन येथून ड्रोन तंत्रज्ञान शिकून आलेला रोहन या क्षेत्रात व्यवसाय करण्याची ईर्षा बाळगून होता. या व्यवसायासाठी केंद्रीय गृहखात्याची परवानगी लागते याची कल्पना असलेला रोहन याच कामाच्या निमित्ताने दिल्लीतील तरुण गुप्ता यांच्या संपर्कात आला. त्याने रोहनला थेट पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम करण्याचे आमीष दाखवले. इतकेच नव्हे तर त्याचे ओळखपत्रही तयार आहे असे सांगून स्क्रिनशॅाटही पाठवला. पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे तुला एक सुरक्षा रक्षकही ठेवावा लागेल, असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार लष्करातून सेवानिवृत्तही स्वीकारलेल्या दिलीप कुंदे यांची नियुक्ती केली. गणेश बागूल (२६) या मित्रासह तो मॅालमध्ये खरेदीसाठी गेला व काही वेळातच परत आला. याच ओळखपत्राचा वापर त्याने जिओ वर्ल्ड प्लाझा या मॅालमध्ये केला, असा युक्तिवाद वकिलाने न्यायालयात केला आहे. मात्र या दोघांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बागूल याचा शोध घेतला जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र वापरल्यामुळे तो अडचणीत आले असले तरी त्याबाबत सत्यासत्यता तपासली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधानांचा नियोजित कार्यक्रम आणि या प्रकरणाचा परस्परसंबंध नसल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते व उपायुक्त राजतिलक रोशन यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. परंतु या नव्या तपासामुळे या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले आहे. पंतप्रधान कार्यालयातील बनावट ओळखपत्र जारी करणारी टोळी आहे का, याचा आता शोध घेतला जात आहे.

वांद्रे कुर्ला संकुलातील नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी ‘जिओ वर्ल्ड’ या मॉलमधून प्रवेश करावा लागतो. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पारिखने आणखी दोन इसमांसह मॉलमध्ये प्रवेश केला. मात्र त्यापैकी एकाकडे रिव्हॉल्व्हर असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला. त्यावेळी संबंधित तरुणाने आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून मोबाईलमध्ये असलेले ओळखपत्र दाखवले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला अन्य दोघांसोबत जाऊ दिले. मात्र या घटनेची माहिती तात्काळ वांद्रे-कुर्ला पोलिसांना दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी या तिघांनी मॉलमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यांच्या हालचालींबाबतही पोलिसांनी माहिती घेतली. या तरुणाला प्रवेश देणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडेही पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातील ओळखपत्र दाखविल्यामुळे आम्ही प्रवेश दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मॉलमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र हे तरुण आढळून आले नाहीत. या तरुणांनी वापरलेल्या वाहनाच्या क्रमांकावरुन पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि पत्ता मिळविला. त्यानंतर पारिख याच्या खार पश्चिम येथील निवासस्थानी पोलीस गेले व त्याची चौकशी केली. पंतप्रधान कार्यालयातील ओळखपत्राबाबत तो नीट माहिती देऊ न शकल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कल्याण येथे राहत असलेल्या कुंदेलाही अटक केली. बागूल याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडूनही या तरुणाची चौकशी केली जात आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घुसण्याची रंगीत तालीम नव्हती ना, याचाही शोध घेतला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.