मुंबई: रशियन तेलाच्या आयतीवरून भारताला धमकावणारा अमेरिका स्वतःच्या अणुऊर्जा उद्योगासाठी रशियाकडून युरेनियम खरेदी करत आहे. अमेरिकेचा हा उघड दुटप्पीपणा पंतप्रधान मोदी उघड का करत नाहीत असा सवाल करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केले असल्याचा आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भारतासारख्या देशांनी स्वस्त रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिका १०० टक्के पर्यंत आयात शुल्क लादण्याची धमकी देत आहे. परंतु, दुसरीकडे अमेरिकेच्या स्वतःच्या अणुऊर्जा उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रशियन युरेनियमच्या आयतीला मात्र अमेरिकन कायद्यातून स्पष्ट सूट देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना आपला “प्रिय मित्र” मानतात, तरीही अमेरिका भारताला आपल्या तालावर नाचवत मालकासारखी वागणूक देत आहे. नक्की कसल्या भीतीपोटी मोदी गप्प आहेत, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
अमेरिकेकडे पंतप्रधान मोदींच्या कारभाराची किंवा रहस्यांची संपूर्ण फाईल आहे का, याच भीतीपोटी मोदींनी स्वतःला आणि देशाच्या आर्थिक हितांना अमेरिकेसमोर सरेंडर केले आहे. आपली काळी रहस्ये लपवण्यासाठी ते भारताला पुन्हा एकदा एका परदेशी ताकदीचा गुलाम बनवत आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
अमेरिका चीनला घाबरते, भारताला गुलाम समजते
चीन हा भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त रशियन तेलाची खरेदी करतो, तरीही अमेरिकेने केवळ भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लादले. चीन प्रत्युत्तरादाखल कारवाई करेल या भीतीपोटी अमेरिकेने त्यांच्यावर हे शुल्क लावले जात नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अमेरिका चीनला घाबरते आणि भारताला मात्र आपला ‘गुलाम’ समजते, असे ते म्हणाले.
