CSMT Fob Collapse : मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी – नरेंद्र मोदी

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वेचा फुटओव्हरब्रीज कोसळून 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान टाईम्स ऑफ इंडिया इमारतीच्या जवळ असलेल्या ब्रीजचा सिमेंटचा स्लॅब कोसळला. या अपघातांमध्ये अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली फसले. मुंबई पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती निवारण यंत्रणा यांनी तात्काळा घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळीच्या जी.टी. , कामा यांसारख्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामध्ये 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

या अपघातानंतर महाराष्ट्र सरकार घटनास्थळी सर्वतोपरीने मदत करत आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थनाही मोदींनी केली आहे.

अपघातग्रस्त पूल हा रेल्वेचा असून त्याची देखभाल ही मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येते. मात्र अपघातानंतर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेत जबाबदारी ढकलण्याचं राजकारण सुरु झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm modi takes a note of csmt foot over bridge collapse offer his condolence