मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव मंडळांनी विशेष महाआरतीचे आयोजन करावे, असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. उत्कृष्ट महाआरतीसाठी हजारोंची बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. तसेच घरगुती गणेशोत्सवासाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या आवाहनाला काँग्रेसने विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने महिनाभराचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीनेही पंतप्रधानांच्या वाढदिवशी महाआरतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसाठी विशेष महाआरती करावी हे सांगणारा प्रकार गणेशोत्सवासारख्या सणाला राजकीय रंग देण्याचा व व्यक्तीविशेषाचे स्तोम माजवण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. याबाबत गणेशगल्लीचा राजा मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक किरण तावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, समन्वय समितीचे आवाहन हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. आमच्या मंडळाचा आरत्यांचा कार्यक्रम हा खूप आधीच ठरलेला आहे आणि त्यात बदल होणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
समन्वय समितीकडून पंतप्रधानांचे कौतुक
विकसित भारताची पायाभरणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी ७६ व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. मोदींच्या नेतृत्वात मागील १२ वर्षांत देशात हिंदू धर्म, हिंदू सण उत्सवांसाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. हिंदू संस्कृती आणि सण परंपरेला सातत्याने प्रोत्साहन देणार्या नेतृत्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेश मंडळांनी एक दिवस गणरायाची विशेष महाआरती आयोजित करावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांत देशात हिंदू धर्म, सण उत्सवांसाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. परंपरेला सातत्याने प्रोत्साहन देणार्या नेतृत्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेश मंडळांनी एक दिवस विशेष महाआरती आयोजित करावी. – ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
