मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित करण्यात आला आहे. वडनगर–वाराणसी सेवा संकल्प यात्रेच्या शुभारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळी गुजरातकडे रवाना झाले. मोदी यांची जन्मभूमी असलेल्या वडनगरला त्यांचे सध्याचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीशी जोडणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने गुजरातमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या पक्तींत शिंदे हे एकमेव मित्रपक्षाचे मुख्य नेते आहेत.

वडनगर येथे गुरुवारी सकाळी विविध धार्मिक विधींनंतर यात्रेला प्रारंभ होणार आहे. शर्मिष्ठा सरोवराच्या परिसरात पवित्र जलाचे विधीवत पूजन करून कलश भरण्यात येणार आहे. त्यानंतर हे कलश हाटकेश्वर महादेव मंदिरापर्यंत नेण्यात येतील. साधू-संतांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाल्यानंतर वडनगर–वाराणसी यात्रेला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. या यात्रेत देशभरातील सुमारे एक हजार युवा सहभागी होणार आहेत. दहा राज्यांमधील १९३ जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे.

वडनगर येथील शुभारंभ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल आणि भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हेमांग जोशी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ते एकमेव मंत्री आहेत.

या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून मात्र राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. वडनगर आणि वाराणसी या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या या यात्रेला धार्मिक आणि संघटनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर महत्त्व देण्यात आले आहे. वडनगर ही मोदींची जन्मभूमी, तर वाराणसी त्यांची लोकसभा मतदारसंघाची कर्मभूमी असल्याने दोन्ही ठिकाणांना पवित्र जलाच्या माध्यमातून जोडण्याची संकल्पना या अभियानात मांडण्यात आली आहे.

. सेवा, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीसारख्या उपक्रमांशी यात्रेला जोडण्यात आले आहे. राज्यातून केवळ एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमातील उपस्थिती त्यामुळे लक्षवेधी ठरली आहे.