फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची भेट मुंबईत झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशातील व्यापार धोरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’ची घोषणा केली. एवढंच नाही तर मॅक्रोन यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर सावरकराच्या हनुमान उडीचा उल्लेखही केला.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“माझे प्रिय मित्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांचं मुंबईत स्वागत करत असताना मला खूप आनंद होतो आहे. मागील वर्षी त्यांनी मला फ्रान्समध्ये झालेल्या AI समिटसाठी बोलवलं होतं. त्यावेळी आम्ही मार्सेलिसची यात्रा केली होती. मार्सेलिस बंदर हे फ्रान्सचं सर्वात मोठं बंदर आहे. फ्रान्स आणि युरोपचा एक मुख्य गेटवे ही आहे. मार्से हे तेच शहर आहे ज्या ठिकाणी पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी युरोपात पाऊल ठेवलं. युरोपातल्या काही भागांमध्ये आजही त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते. तसंच मार्सेलिस बंदर हे तेच बंदर आहे ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांपासून सुटका करुन घेण्यासाठी हनुमान उडी घेतली होती. त्यांचं हे पाऊल भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या अतूट संकल्पाचं प्रतीक ठरलं. मला मागील वर्षी मार्सेमध्ये त्यांची आठवण जागवण्याचा आणि त्यांना नमन कऱण्याची संधी मिळाली होती. आता फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन हे भारतात एआय परिषदेसाठी आले आहेत, आम्ही त्यांचं स्वागत भारताचं गेटवे म्हणजेच मुंबईत करत आहोत.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

वीर सावरकर यांची ऐतिहासिक उडी

वीर सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आले होते तेव्हा ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने भारतात नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी उडी मारली होती. एवढंच नाही तर वीर सावरकर६० यार्ड एवढे अंतर पाहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर सावरकरांच्या याच ऐतिहासिक ठरलेल्या उडीची आठवण फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर करुन दिली आहे.