मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ आता महिला व बालविकास विभागाने विभागीय कार्यक्रमांची जोड दिली आहे. महिनाभराच्या या अभियानात प्रत्येक अंगणवाडीत ‘अंगणवाडी उत्सव’, महिलांसाठी आरोग्य तपासणी, स्वयंसहायता गटांची नोंदणी, बालसंरक्षण जनजागृती आणि शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाच्या निमित्ताने भाजपने याच कालावधीत देशभर विविध सेवाभावी कार्यक्रमांची घोषणा केली आहे. १७ सप्टेंबरपासून रक्तदान शिबिरांसह विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, ‘सेवा मेरा योगदान’, ‘सेवा सेतू’, ‘आशीर्वाद का दिया’, ‘नमो सेवा गाथा’ यांसारख्या उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर आखणी करण्यात आली आहे. मुंबईतही हे उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष अमित साटम यांनी शनिवारी दिली. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत आधीच मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला व बालविकास विभागाकडून प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अंगणवाडी उत्सव’ घेण्यात येणार आहे. या उत्सवात बालके, माता, किशोरवयीन मुली आणि स्थानिक समुदायाचा सहभाग घेऊन महिला व बालविकास विभागाच्या आरोग्य, पोषण आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती दिली जाणार आहे. संभाव्य पात्र लाभार्थ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी आणि पात्रतेनुसार लाभ देण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश आहेत.

रक्तक्षय तपासणीपासून मासिक पाळीच्या स्वच्छतेपर्यंत

महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून रक्तक्षयाची तपासणी, मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. माता आणि पालकांना लसीकरण, बालकांची वाढ, स्तनपान, पूरक आहार तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत समुपदेशन करण्याचे आदेश आहेत. गरज असलेल्या महिला आणि बालकांना आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्याची जबाबदारीही अंगणवाडी यंत्रणेवर टाकण्यात आली आहे.

आशीर्वादाचा दिवा

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांना स्वयं-सहायता गट, उपजीविकेच्या संधी, कौशल्यविकास आणि उद्योजकता विकास योजनांशी जोडण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल. त्याचबरोबर विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम राबविला जाईल.