pm narendra modi to visit mumbai on february 10 to flag off two vande bharat express trains mumbai print news zws 70 | Loksatta

पंतप्रधानांचा १० फेब्रुवारीला मुंबई दौरा

मुंबईत एका समुदायाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी येणार आहेत.

pm narendra modi to visit mumbai

मुंबई : सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

मुंबईत एका समुदायाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी येणार आहेत. त्याच वेळी सीएसएमटी येथे १५ मिनिटांच्या कार्यक्रमात मोदी यांच्याकडून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे.

देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ एसी डबे आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे.

मुंबई – शिर्डी लवकरच ‘वंदे भारत’

सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आठवडय़ातील सहा दिवस धावणार (गुरुवार वगळता) असून ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे. सीएसएमटीतून सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे.

दरम्यान, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवडय़ातील सहा दिवस धावेल. (बुधवार वगळता). सोलापूर येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 03:02 IST
Next Story
अदानींच्या कर्जाचा बँकांकडून आढावा; काळजीचे कारण नाही – स्टेट बँक