व्हॉट्स अ‍ॅपवर चित्रफिती आणि व्यंगचित्र यांचा भडिमार

निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार रविवारी संध्याकाळी थांबला असला, तरी छुप्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपला पक्ष आणि चिन्ह नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रकार सोमवारीही सुरू असल्याचे दिसून आले. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्यात येत असून, प्रामुख्याने व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मतदानाच्या आवाहनाच्या नावाखाली प्रचार केला जात आहे. त्याबाबतच्या चित्रफिती आणि काही व्यंगचित्रही काहींकडून पाठविली जात आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता झाली. त्यानंतर कुणी प्रचार केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जातो. समाज माध्यमातूनही प्रचार होऊ शकतो, ही बाब लक्षात आल्याने या माध्यमातून प्रचार करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडून आयोगाने मागेच दिले आहेत.

त्यामुळे प्रचाराची सांगता होताच व्हॉट्स अ‍ॅपवरील काही ग्रुपमध्ये प्रचाराचे संदेश न पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. याबाबत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा संदेशही अनेक ग्रुपने प्रसारित केला. मात्र, त्यानंतही काही ग्रुपमध्ये प्रचाराच्या चित्रफिती प्रसारित झाल्या.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपपेक्षा प्रामुख्याने वैयक्तिकरीत्या येणारे प्रचारासंबंधी संदेश व चित्रफितींची संख्या जास्त आहे. त्यावर लक्ष ठेवण्यास निवडणूक यंत्रणाही हतबल असल्याचे दिसते. येणारे संदेश व चित्रफितीमध्ये पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करणारे संदेश आणि व्यंगचित्रांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. ‘२१ फेब्रुवारीला बाहेर पडा, तुमच्या हक्कांसाठी लढा’ असे मतदानाचे आवाहन करताना शेवटी पक्षाचे चिन्ह दाखविणारा संदेश मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करीत असलेली चित्रफीतही दिवसभर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व वैयक्तिकरीत्या प्रसारित झाली. त्यामुळे जाहीर प्रचार थांबला असला, तरी समाज माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरूच असल्याचे सोमवारी दिसून आले.

गुन्हेगारी हाच सामाईक मुद्दा

महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये सर्वच प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार उतरविले असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. समाज माध्यमांमध्ये फिरणारे संदेश आणि व्यंगचित्रांमध्येही गुन्हेगारी हाच सामाईक मुद्दा आहे. प्रत्येकाचे समर्थक एकमेकांवर गुन्हेगारीचा आरोप करीत आहेत. ‘तुम्ही विरुद्ध गुन्हेगारी’ असा आशय असलेला संदेश भाजप समर्थकांकडून पसरविण्यात आला आहे. तर, विरोधकांकडून भाजपवर गुन्हेगारीचा आरोप करणारे व्यंगचित्र पसरविले जात आहे.

पाडायचे कोणते ते आम्ही ठरवू..

मतदारांना जागृत करणारे त्याचप्रमाणे कोणत्याही पक्षाची जाहिरात न करता केवळ मतदानाचे आवाहन करणारे संदेशही समाज माध्यमांत फिरत आहेत. त्यातील काही संदेश कमालीचे लोकप्रिय ठरले असून, दिवसभर समाज माध्यमांमध्ये त्यांची चर्चा आहे. ‘उमेदवार उभे कोणते करायचे, हे तुम्ही ठरविले. आता पाडायचे कोणते ते आम्ही ठरवू..’ हा सुज्ञ मतदाराचा चित्रमय संदेश अनेकांचे लक्ष वेधणारा ठरला.