मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुलातील मॉलमध्ये प्रवेशासाठी बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी तरुणाने ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन पारिख (२४) आणि त्याचा साथीदार दिलीप कुंडे (४९) यांना अप्पर मुख्य न्यायदंडधिकाऱ्यांनी (किल्ला कोर्ट) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉलमध्ये ७ सप्टेंबर रोजी सुरक्षा रक्षकांशी वाद घालताना रोहन पारिखने स्वतःला पीएमओचा अधिकारी असल्याचे सांगितले होते. पोलिसांच्या तपासात त्याच्या घराच्या झडतीदरम्यान चॅटजीपीटीच्या मदतीने तयार केलेले पीएमओचे अनेक बनावट दस्तऐवज सापडले. कौटुंबिक आणि सामाजिक वर्तुळात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण २०२५ पासून चॅटजीपीटीचा वापर करून हे बनावट दस्तऐवज तयार करत असल्याचे रोहनने पोलीस चौकशीत कबूल केले.
रोहनसोबत असलेला दिलीप कुंडे हा माजी सैनिक असून त्याच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. वैयक्तिक वापरासाठी परवाना असलेले हे शस्त्र रोहनचा ‘बॉडीगार्ड’ म्हणून व्यावसायिकरित्या वापरले जात होते. दरम्यान, या घटनेचा पंतप्रधानांच्या दौऱ्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी आरोपींची अधिक कोठडी मिळावी यासाठी मागणी केली होती. मात्र, आरोपींच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्व तांत्रिक साहित्य पोलिसांनी आधीच जप्त केल्याने कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
