मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फरारी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे दोन भाऊ नीशल आणि नेहल मोदी यांना विशेष न्यायालयाने नोटीस बजावली. तसेच, त्यांनाही या प्रकरणी अधिकृतपणे फरारी आर्थिक गुन्हेगार (एफईओ) का घोषित करू नये हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या दोघांनाही फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत फरारी घोषित करण्याच्या मागणीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अर्ज केला आहे. त्याची दखल घेऊन आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी नीशल आणि नेहल यांना नोटीस बजावली व उपरोक्त आदेश दिले. मोदी याच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, आदित्य नानावटी आणि संदीप मिस्त्री यांनाही विशेष न्यायालयाने अशाच प्रकारची नोटीस बजावली. सगळ्यांना त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी ७ मेपर्यंतची मुदत दिली.

एखाद्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आल्यावर त्याची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. नेहल याने नीरव मोदी याला बनावट कंपन्या आणि परदेशातील व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग करण्यास आणि त्याची माहिती लपवण्यास मदत केली. तर, नीशल हा बनावट भागीदारांच्या नियुक्तीमध्ये सहभागी होता. २०११ ते २०१३ दरम्यान दुबईतील काही बनावट कंपन्यांमध्ये तो लाभार्थी होता, असा ईडीचा आरोप आहे. नेहल मोदी याला २०२५ मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. तो ईडी व सीबीआयने त्याच्याविरुद्ध सुरू केलेल्या प्रत्यार्पणाच्या कारवाईविरुद्ध लढत आहे.

फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या असलेल्या नीरव मोदी यांच्यावर पीएनबीच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (एफएलसी) वापरून पीएनबीमधून २३ हजार ७८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम लुटल्याचा आरोप आहे. विशेष न्यायालयाने २०१९ मध्ये नीरव मोदी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते, तर चोक्सीविरुद्धच्या याबाबतच्या कारवाईची ईडीची याचिका अद्याप प्रलंबित आहे. चोक्सी सध्या बेल्जियममध्ये प्रत्यार्पणाच्या कारवाईला सामोरे जात आहे, तर नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे.