गेल्या एक-दीड वर्षात देशभरात दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरण वाढत असल्याचे सांगत कवियत्री प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी राज्य शासनाकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत देण्याची घोषणा केली. देशभरात काय खावं, प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेष परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं याबाबतीत भयाचं सावट घेऊन लोक जगत आहेत. सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरच विद्यमान शासनव्यवस्थेकडून घाला घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्यासारखा आहे. त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेले आजवरचे सर्व शासकीय पुरस्कार, पुरस्कारांच्या रक्कमेसह शासनाला परत करत असल्याचे प्रज्ञा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
तत्पूर्वी साहित्यकांच्या या पवित्र्यावर केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी टीका करताना हे लोक लिहिण्यास असमर्थ असतील तर आधी त्यांना लिहिणे थांबवून द्या, असे म्हटले होते. दरम्यान, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचार करण्यासाठी साहित्य अकादमीने २३ ऑक्टोबरला तातडीची बैठक बोलावली आहे. कलबुर्गी तसेच दादरीतील एका मुस्लीम व्यक्तीची हत्या हे देशात जातीयवादी वातावरण आणि वाढलेल्या असहिष्णुतेचे निदर्शक असल्याचे या लेखकांचे म्हणणे आहे.