काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांना धमकाविणाऱ्या छोटा शकीलच्या गुंडासहा दोघांना मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली आहे. वांद्रे येथील एका भूखंडाच्या प्रकरणावरून सिद्दिकी यांनी धमकावले जात होते.
काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांचा वांद्रे पाली हिल येथील एका भुखंडावरू शम्श सय्यद याच्यासोबत वाद सुरू होता. सिद्दिकी आणि सैय्यद दोघे मिळून तो भूखंड विकसित करणार होते. मात्र काही मुद्यावरून त्यांच्यात बिनसले होते. त्यानंतर वाद सुरू झाला होता. काही दिवसांपूर्वी छोटा शकीलचा गुंड अहमद लंगडा याने आमदार सिद्दिकी यांना त्यावरून धमकवायला सुरुवात केली होती. तर खुद्द छोटा शकीलनेही फोनवरून सिद्दिकी यांना धमकावले होते. त्यामुळे सिद्दिकी यांनी १६ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी तपास करून सोमवारी शम्श सैय्यद आणि अहमद लंगडा या दोघांना अटक केली. मंगळवारी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. छोटा शकील यालाही या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले आहे. त्यांना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.