scorecardresearch

मुंबईः केवळ ११०० रुपयांमध्ये मिळत होते आधारकार्ड, पॅनकार्ड ; वाचा नक्की काय प्रकरण आहे ते…

या कारवाईत पोलिसांनी विविध नावे आणि छायाचित्र असलेली  ३० आधारकार्ड आणि सात पॅनकार्ड जप्त केली.

मुंबईः केवळ ११०० रुपयांमध्ये मिळत होते आधारकार्ड, पॅनकार्ड ; वाचा नक्की काय प्रकरण आहे ते…
प्रतिनिधिक छायाचित्र photo source : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

कुठल्याही कागदपत्रांशिवाय ११०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविणार्‍या एका ई-सेवा केंद्राच्या मालकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अरुणेशकुमार शामनारायण मिश्रा असे या मालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध नावे आणि छायाचित्र असलेली  ३० आधारकार्ड आणि सात पॅनकार्ड जप्त केली.

हेही वाचा >>>मुंबई : गोवर संशयित रुग्णांच्या मृत्युची संख्या एकने कमी झाली ; कशी ती वाचा…

अरुणेशकुमार हा गोरेगाव येथील प्रेमनगर, ओम साई सेवा मंडळ परिसरात राहात असून त्याच्या मालकीचे प्रेमनगर येथे ई-सेवा केंद्र आहे. या ई-सेवा केंद्रात कुठल्याही कागदपत्राशिवाय बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका तोतया ग्राहकाला या ई-सेवा केंद्रात पॅनकार्ड बनविण्यास पाठविले. त्याने अरुणेशकुमारची भेट घेतली आणि बनावट पॅनकार्ड बनवून देण्यास सांगितले. त्यासाठी त्याने त्याच्याकडून ११०० रुपये घेतले. या माहितीची शहानिशा केल्यानंतर उपनिरीक्षक अविनाश नलावडे, वैष्णव, म्हेत्रे, कर्पे, दाणी, सावर्डे यांनी संबंधित ई-सेवा केंद्रात छापा टाकून अरुणेशकुमार मिश्रा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आतापर्यंत अनेकांना बनाटव आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीचे कोणी साथीदार आहेत का ? तसेच त्याने आतापर्यंत किती जणांना बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून दिले आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:32 IST

संबंधित बातम्या