तो भेंडीबाजारात हमाली करत पाठीला रग लागेपर्यंत काम करायचा तर, दुसरा शिवाजी नगर परिसरात छोटेखानी मटणाचे दुकान चालवत होता. दोघांची कमाई जेमतेम घर चालविण्यापुरती. देवनारच्या पशूवधगृहात शनिवारच्या बाजाराच्या वेळी दोघे गेले असताना उपहारगृहात बसलेले व्यापारी आणि त्यांच्यात लाखोंच्या उलाढालीच्या गप्पा ऐकून ते थक्क झाले. तेव्हाच दोघांनी ठरविले, एका व्यावसायिकाला गाठून लुटायचे. पहिल्याच प्रयत्नांत त्यांच्या हाती लागले दोन लाख रुपये. मग सहज मिळणाऱ्या या पशांची चटक दोघांना लागली. पण बीकेसी पोलिसांच्या हद्दीत झालेल्या लुटीचा तपास पोलिसांनी केला आणि दोघांनाही अटक झाली.
काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘एमटीएनएल’जवळ एका व्यापाऱ्याची वाट अडवून लुटल्याची तक्रार दाखल झाली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुंडलिक निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरिक्षक (गुन्हे) कलीम शेख यांनी सुरू केला. तपास करत असताना, गेल्या काही महिन्यांत अशाच पध्दतीने देवनार, विनोबा भावे नगर, नेहरु नगर आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारची लूट झाल्याचे लक्षात आले. खबरी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे बीकेसी पोलिसांनी अख्तर रझा अन्सारी (वय २५), अब्दुल हमीद कुरेशी (वय २८) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीत पोलिसांपुढे लुटीची एक वेगळीच कथा उलगडली.
शिवाजीनगर परिसरात मटणाचे दुकान असलेला अब्दुल हमीद कुरेशी आणि अख्तर रझा अन्सारी दोघे मित्र. अन्सारी हा भेंडीबाजारात हमालीची कामे करायचा. बकऱ्याचे मटण आणण्यासाठी कुरेशी अधूनमधून देवनारच्या पशूवधगृहात जात असे. शनिवारी बकऱ्याचा मोठा बाजार भरत असल्याचे कुरेशीला ठाऊक होते. एका शनिवारी पशूवधगृहाच्या उपहारगृहात दोघे बसले असताना बकऱ्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांच्या लाखोंच्या उलाढालीच्या गप्पा त्याच्या कानावर पडल्या. या व्यापाऱ्यांपकी एकाला जरी लुटले तर, आपली चन होईल याची त्यांना खात्री पटली. जून, २०१५ मध्ये देवनारमधील टाटा कॉलनीजवळ एका व्यावसायिकाचा मोटारसायकलवरुन पाठलाग करुन दोघांनी त्याला अडवले. त्याच्या डोळ्यांत मिरची पडू टाकून चॉपरचा धाक दाखवत त्याच्याकडील तब्बल दोन लाख रुपये लुटले. पहिल्याच प्रयत्नात इतकी मोठी रक्कम मिळाल्याचे पाहून दोघांचेही डोळे दिपले. मग, त्यांना या लुटीचा हव्यास जडला. विनोबा भावे नगर, शीव उड्डाणपूल, अमर महल येथे त्यांनी लूट केली.
अमर महल येथे तर पसे द्यायला नकार देणाऱ्या व्यावसायिकावर त्यांनी चॉपरने वार करत लूट केली. मार्च महिन्यात बीकेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी लूट केल्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. खबरी आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी त्यांना बेडय़ा ठोकल्या. लुटीचा पसे उंची कपडे, फिरणे, घराची दुरुस्ती यावर दोघांनीही खर्च केले. हमाली करणारा अन्सारी तर उंची कपडे, मोबाईल घेऊनच हमाली करत फिरत असे. पण, लुटालूट करुन सहज आयुष्य जगता येते या दोघांच्या भ्रमाचा भोपळा मुंबई पोलिसांनी फोडलाच. दोघांचीही रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.