scorecardresearch

खोदकामानंतर रस्त्यावरच राडारोडा टाकणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार

विविध सेवा व उपयोगिता वाहिन्यांसाठी रस्ता खोदल्यानंतर तेथील राडारोडा तात्काळ न हटविणाऱ्या संस्थेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

(प्रातिनिधीक फोटो)

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे निर्देश

मुंबई : विविध सेवा व उपयोगिता वाहिन्यांसाठी रस्ता खोदल्यानंतर तेथील राडारोडा तात्काळ न हटविणाऱ्या संस्थेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. पालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर ८ मार्चपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली असून पहिल्याच दिवशी आयुक्तांनी पावसाळापूर्व तयारीची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी प्रशासक या नात्याने वरील निर्देश दिले.

 इंटरनेट, विद्युत सेवा अशा विविध विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. या ठिकाणचा राडारोडा वेळच्या वेळी हटविणे गरजेचे असते. मात्र हा राडारोडा वेळीच न हटविल्यास तो पावसाच्या पाण्यामुळे वाहून जातो. काही वेळा तो पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेत अडकतो आणि परिसरात पाणी तुंबते. त्यामुळे वेळीच राडारोडा न हटविणाऱ्या संस्थांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त पालिका आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी, आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर, संबंधित सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आणि विविध यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.  पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होणाऱ्या ठिकाणी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील सर्व मनुष्य प्रवेशिका अर्थात ‘मॅन होल’ व संरक्षक जाळय़ा याबाबत नियमितपणे पाहणी व पडताळणी करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याद्वारे विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने येत्या पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्तरावर समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचू नये किंवा खड्डे पडू नयेत यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. तसेच या दोन्ही महामार्गालगत असणाऱ्या मोऱ्यांची (कल्व्हर्ट) साफसफाई करावी.

उद्यान खात्याने पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून झाडांची छाटणी वेळच्या वेळी व शास्त्रोक्त पद्धतीने करावी, रस्त्यांची सुरू असलेली कामे ही १५ मेपर्यंत पूर्ण करावी, विद्युत पुरवठय़ाबाबत ‘बेस्ट’ उपक्रमासह सर्व संबंधित वीज पुरवठादार कंपन्यांनी पावसाळय़ात उद्भवणाऱ्या बाबींच्या अनुषंगाने सजग व तत्पर राहावे, दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणांबाबत तातडीने कार्यवाही करावी, पावसाळय़ातील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने भारतीय नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक व मुंबई अग्निशमन दलाने तैनात राहावे, साथ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह सुसज्ज राहावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police complaint organizations put radar road excavation ysh

ताज्या बातम्या