संशयित दहशतवादी शेख धारावीचा रहिवासी

दिल्ली पोलिसांनी देशभरात एकाच वेळी छापे मारून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती.

जान मोहम्मद शेख

मुंबई : भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी देशभरातून मंगळवारी अटक केली. यातील जान मोहम्मद शेख हा धारावीचा राहणारा असून त्याचे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्याजवळ कोणतीही स्फोटके सापडली नसल्याचे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई आणि राज्य सुरक्षित असून कोणतीही स्फोटके मुंबईत आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली पोलिसांनी देशभरात एकाच वेळी छापे मारून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यातील दोघेजण पाकिस्तानच्या आयएसआयकडून प्रशिक्षण घेऊन आले होते. दाऊदच्या साथीदारांना हाताशी धरून आयएसआयने देशात गणपती, नवरात्र आणि रामलीलादरम्यान दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता, असे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. पाकिस्तानात राहणारा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हा या हल्ल्याची सूत्रे हाताळत होता, असेही पोलिसांनी सांगितले. शेख दिल्लीला जाण्याच्या बेतात होता. त्याने ९ तारखेला तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तिकीट मिळाले नाही. गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस गाडीचे हजरत निजामुद्दीन दिल्ली स्थानकाचे तिकीट त्याला १३ तारखेला मिळाले. या गाडीने तो निघाला असताना दिल्ली पोलिसांनी राजस्थानातील कोटा येथून त्याला अटक केली. त्याचबरोबर अन्य पाच जणांना अटक केली.

केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचे ठिकाण दिल्लीत असल्याने तेथूनच हे अभियान राबविण्यात आले. याबाबत महाराष्ट्र पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्याचे दहशतवादविरोधी पथक दिल्लीत जाणार असून शेखची चौकशी केली जाणार आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली जाणार असून महाराष्ट्र पोलिसांकडे उपलब्ध असलेली माहिती त्यांना दिली जाणार आहे. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस एकत्र काम करतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

शेख याच्यावर २० वर्षांपूर्वीचा दाऊद टोळीशी संबंधित गुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यानंतर २०१० सालातील वीज चोरीचाही एक गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. त्याच्या हालचालींवर पोलिसांची नजर होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police crime suspected terrorist sheikh dharavi resident akp