बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी वसूल करताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड अश्विन नाईक व त्याच्या साथीदारांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
दादर येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून  ५० लाख रुपयांची खंडणी व नवीन इमारतीमध्ये सहा हजार चौरस फूटांची जागा अश्विनने  मागितली होती. अश्विन नाईक याने यापूर्वी या बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या भागीदाराकडून २५ लाख रुपये वसूल केले होते. यानंतरही नाईकच्या टोळीने पुन्हा त्याच्याकडून खंडणी मागितली. ही रक्कम देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने वेळ मागून घेतला. यानंतर त्या व्यावसायिकाने दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बांधकाम व्यावसायिकाने अश्विन नाईक व त्याचे साथीदार ही रक्कम घेण्यासाठी रविवारी भवानी शंकर रोडवर येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून अश्विन नाईकसह  त्याचे साथीदार प्रमोद केळुस्कर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या चार साथीदारांनाही न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.