मुंबई : पोलीस विभागासाठी आवश्यक असलेल्या दळणवळण उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, उपकरणांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी आणि निविदा प्रक्रियेत दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्याने राज्य सरकारने दोन कंपन्यांना शासकीय खरेदी प्रक्रियेतून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. व्हर्टेल इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हर्टेल डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांविरुद्ध गृह विभागाने १६ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी केला.

राज्याच्या पोलीस विभागातील बिनतारी दळणवळण यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्यासाठी डिजिटल संच, डिजिटल वॉकीटॉकी आणि डिजिटल रिपीटर यांसारख्या उपकरणांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत नवी दिल्ली येथील व्हर्टेल इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथील व्हर्टेल डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

यापूर्वी पोलीस विभागाला उपकरणांचा पुरवठा करताना संबंधित कंपन्यांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले होते. मुंबई लोहमार्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पोलीस घटकांसाठी पुरविण्यात आलेल्या व्हीएचएफ उपकरणांची गुणवत्ता अपेक्षित दर्जाची नसल्याचे आढळले होते. तसेच ठाणे शहरासाठी पुरविण्यात आलेल्या ४०० मेगाहर्ट्झ उपकरणांच्या गुणवत्तेबरोबरच हमी कालावधीत तक्रारींना प्रतिसाद देण्याबाबतही असमाधान व्यक्त करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी न देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार १३ जानेवारी रोजी शासनाने या कंपन्यांना पोलीस विभागाच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यापासून निलंबित केले होते.

यानंतर पोलीस उपआयुक्त, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, उत्तर विभाग, मुंबई यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेचे पालन न करणे, मूळ उपकरण उत्पादकाकडून (ओईएम) आवश्यक अधिकृतता आणि हमीच्या जबाबदाऱ्यांबाबत दिशाभूल करणे, तसेच अनुचित आणि अपारदर्शक मार्गांचा अवलंब करणे, असे निष्कर्ष नोंदविण्यात आले.

चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शासकीय खरेदी प्रक्रियेतून कायमचे प्रतिबंधित करण्याची शिफारस केली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सुधारित खरेदी नियमावलीतील तरतुदींचा विचार करून गृह विभागाने दोन्ही कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गृह विभाग आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना या कंपन्यांसोबत कोणत्याही शासकीय खरेदीसंदर्भात करार किंवा अन्य कार्यवाही करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस दलासाठी आवश्यक उपकरणांच्या खरेदीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि पुरवठादारांची जबाबदारी यांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.