मुंबई : प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार हद्दपारीची कारवाई केली जाते. आयुक्तालयांच्या हद्दीत ही कारवाई पोलिसांकडून केली जाते. मात्र ग्रामीण भागात पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी निर्णय घेऊन हद्दपारीचे आदेश देतात. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही हद्दपारीचे आदेश पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे प्रस्तावीत असल्याचे कळते.
मुंबई पोलीस अधिनियमानुसार ५६ (१) अन्वये गुन्हा करण्याच्या बेतात असणाऱ्या किंवा संभव असणाऱ्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हद्दपार करण्याचे अधिकार शहरात पोलीस आयुक्तांना तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयात हे अधिकार आयुक्तांकडून उपायुक्तांना बहाल केले जातात. याच धर्तीवर ग्रामीण भागात हे अधिकार पोलीस अधीक्षक किंवा अप्पर अधीक्षक यांना प्रदान करण्यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दिशेने हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुलकी अधिकार आणि पोलीस अधिकार हे वेगवेगळे असावेत हे घटनेचे सर्वमान्य तत्त्व आहे. सद्यस्थितीत पोलीस निरीक्षक हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत संबंधित जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवतात. त्याबाबत संबंधित कार्यकारी दंडाधिकारी पुढील प्रक्रिया पूर्ण करून अपराध करण्याच्या बेतात असणाऱ्या व्यक्तींना हद्दपार करण्याची कारवाई करतात. हे अधिकार पोलीस विभागांना दिल्यास ग्रामीण भागात पोलिसांच्या हाती अमर्याद शक्ती एकवटणार आहे. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करणे आणि त्याच विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संभाव्य व्यक्तींना हद्दपार करणे हे नैसर्गिक न्याय तत्त्वाला हरताळ फासणारे आहे. या तरतुदीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत गृहविभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, महसूल अधिकाऱ्यांकडे हद्दपारीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असतात. त्यामुळे हे अधिकार पोलीस विभागाला देण्याची मागणी पोलीस विभागाकडून केली जात आहे. या मागणीचा शासनाकडून गंभीरपणे विचार केला जात असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. मुळात पोलीस निरीक्षकाकडून हद्दपारीचे प्रस्ताव पाठविताना त्रुटी ठेवली जाते. बऱ्याच वेळा पुरावे पुरेसे नसतात. पोलीस विभागाने परिपूर्ण प्रस्ताव विहित वेळेत पाठवल्यास त्यावर तातडीने निर्णय घेतला जातो. महसूल विभागाकडून काही वेळा विलंब होतो. त्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती ठरवून दिल्यास या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. परंतु त्यासाठी सर्वाधिकार पोलिसांकडे देणे अयोग्य आहे, असे मत महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
