Premium

…आणि एका चावीने मुंबईतील विवस्त्र मृतदेहाचं गूढ उलगडलं, नेमकं काय घडलं वाचा…

मुंबईतील सावित्रीबाई फुले नावाच्या सरकारी वसतिगृहात आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या विवस्त्र मृतदेहाचं गूढ एका चावीने उलगडलं.

Mumbai Rape Murder Case
एका चावीने मुंबईच्या वसतिगृहातील निर्वस्त्र मृतदेहाचं गुढ उलगडलं (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबईतील सावित्रीबाई फुले नावाच्या सरकारी वसतिगृहात एका १९ वर्षीय पीडितेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला आणि खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि एका चावीने या प्रकरणातील गूढ उकललं. पोलिसांना चर्नी रोड रेल्वे मार्गावर सापडलेल्या एका मृतदेहाच्या खिशात एक चावी सापडली याच चावीने पोलिसांना आरोपीचा शोध लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांना चर्नी रोड रेल्वे मार्गावर ओम प्रकाश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. तपासात या व्यक्तीच्या खिशात एक चावी सापडली. ही चावी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील एका रुमची असल्याचं समोर आलं. त्यामुळे चर्नी रोडवरील मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून वसतिगृहात विवस्त्र अवस्थेत आढळलेल्या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणातील आरोपीचा आहे हे स्पष्ट झालं.

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले या मुलींच्या सरकारी वसतिगृहातून विदर्भातील एक मुलगी मंगळवारपासून (६ जून) बेपत्ता होती. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील तिची खोली बाहेरून लॉक होती. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून तपास केला, तर तेथे पीडित तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या गळ्याभोवती ओढणी होती. यानंतर पोलिसांनी पीडितेचा बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

घटना घडली तेव्हा ४५० मुलींची व्यवस्था असलेल्या या वसतिगृहात सध्या केवळ ४०-५० मुलीच राहत होत्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. वसतिगृहाच्या रेक्टरांनी मुलींकडून छेडछाडीची कधीही तक्रार आली नसल्याचा दावा केला. मात्र, याआधीही छेडछाड झाल्याची तक्रार एका मुलीने केली होती. त्याच मुलीने या प्रकरणाबाबत माहिती दिली.

घटना नेमकी कधी घडली?

पीडित मुलीवर बलात्कार करून हत्येची घटना नेमकी कधी घडली याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार ही घटना रात्री साडेअकरा ते पहाटे पावणेपाच वाजल्याच्या दरम्यान घडली असावी.

मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

वसतिगृहातील सीसीटीव्ही बंद असणं, महिला सुरक्षारक्षक नसणं, वसतिगृहाचे गेट रात्रीच्यावेळी आतून बंद असणे अपेक्षित असताना आरोपीला प्रवेश मिळणे या प्रकारांनी या वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : “मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली, पीडित तरुणीला…”, मुंबईतील बलात्कार-हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. विशेष म्हणजे आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आलेली नाही. त्याच्यावर आधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 11:41 IST
Next Story
Metro 3: आरे ते बीकेसी टप्प्याचे ८८ टक्के काम पूर्ण; बीकेसी ते कफ परेड टप्पाही वेगात