मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने तेथील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.  आढाव्यानंतर पवारांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा  अहवाल वरिष्ठांना सादर केला असून त्यात सुरक्षेच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यात सिल्व्हर ओक आणि स्थानिक गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये थेट संपर्क यंत्रणा उभारणे, गावदेवी पोलीस ठाण्यातील संख्याबळ वाढवणे व सुरक्षेच्या दृष्टीने सिल्व्हर ओकवरच्या प्रवेशद्वारावर इंटरलॉकिंग बॅरिकेड्स वापरणे, अशा शिफारशींचा समावेश आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पवार यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. आंदोलनाच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमांच्या अनुषंगाने सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी कोणत्या चुकांमुळे आंदोलक थेट घरापर्यंत पोहोचले, याची तपासणी करण्यात आली. तसेच परिसर व निवासस्थानाच्या नकाशाचा अभ्यास करून या अभ्यासपूर्ण शिफारशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वात गंभीर बाब म्हणजे आंदोलक निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस नियंत्रण कक्षाला सिल्व्हर ओकमधून दूरध्वनी करण्यात आले होते. पण दूरध्वनी केल्यानंतरही स्थानिक गावदेवी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागला. त्याबाबत पवार कुटुंबीयांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिल्व्हर ओक व स्थानिक गावदेवी पोलीस ठाण्यात थेट संपर्क यंत्रणा निर्माण करण्याबाबत विशेष शाखेकडून शिफारस करण्यात आली आहे.

अशी परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास तात्काळ पोलीस उपलब्ध व्हावेत, यासाठी गावदेवी पोलीस ठाण्यातील संख्याबळात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये पदे रिक्त आहेत. पण गावदेवीसारख्या बंदोबस्ताच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्यामधील सर्व रिक्त जागा भरण्याची शिफारस करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सिल्व्हर ओक व त्याच्या आजूबाजूच्या भिंती उंच असल्यामुळे तेथून आवारात प्रवेश करणे सोपे नाही, मात्र एसटी आंदोलनाप्रमाणे प्रवेशद्वारातूनच प्रवेश करणे शक्य असल्यामुळे लोकांना आवारात सहज प्रवेश मिळू नये म्हणून बाहेर इंटरलॉकिंग बॅरिकेड्स उभारण्यास सांगितले आहे. या आढाव्याशिवाय, या घटनेला कारणीभूत असलेल्या त्रुटींबाबत सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निलंबित करण्यात आले असून परिमंडळ २ मध्ये पूर्णवेळ उपायुक्ताची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.

शिफारशी काय?

सिल्व्हर ओक आणि स्थानिक गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये थेट संपर्क यंत्रणा उभारणे, गावदेवी पोलीस ठाण्यातील संख्याबळ वाढवणे व सुरक्षेच्या दृष्टीने सिल्व्हर ओकवरच्या प्रवेशद्वारावर इंटरलॉकिंग बॅरिकेड्स वापरणे, अशा शिफारशींचा समावेश आहे.