तीन कोटींचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी राहुल राय (२७) याला गावदेवी पोलिसांनी ग्रँट रोड येथून अटक केली. एमआयडीसी भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा राहुल गेले तीन महिने पोलिसांना गुंगारा देत होता.
अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी भागात सोन्याचे दागिने बनविण्याचे कारखाने आहेत. या कंपनीतील दागिने कुरिअर कर्मचाऱ्यांच्या मार्फत बाहेर विक्रीसाठी नेले जातात. २७ सप्टेंबरला दागिने घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील १ कोटी रुपये किमतीचे दागिने लुटण्यात आले होते. २६ ऑक्टोबरलाही अशाच प्रकारे दरोडा घालून सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे दागिने लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली होती; परंतु मुख्य आरोपी राहुल राय (२७) फरार होता. गावदेवी पोलीस गेल्या महिन्याभरापासून या आरोपींच्या मागावर होते. शनिवारी तो ग्रँट रोड स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक हेगिस्टे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. एमआयडीसी परिसरातील कंपनीत राय हा सुरक्षारक्षकाचे काम करायचा. त्यामुळे त्याला दागिने कारखान्यातून नेण्याची प्रक्रिया माहीत होती. त्यामुळे त्याने दरोडय़ाची योजना बनविल्याचे लोणंदकर यांनी सांगितले. राय याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे.