मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरभरात ‘ऑल आऊट’ हे अभियान राबविले. शहरात ध्वजवंदन होणाऱ्या सरकारी आणि खासगी अशा ८८४ ठिकाणी तपासणी करण्यात आली. तर शहरातील २३० ठिकाणी शोधमोहिमेत  अभिलेखावरील ३८२ आरोपींविरोधात पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली.

कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, ४१ विभागीय साहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते. शुक्रवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली. अभियानादरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील ७९ पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली. तर अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या १२१ जणांना पोलिसांनी अटक केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळून २ अग्नीशस्त्रे आणि ३५ चाकू व तलवारी जप्त केल्या.

अजामीनपात्र गुन्ह्यातील ३२ आरोपींना अटक केली. अवैध धंद्यावर ४८ ठिकाणी छापे मारून पोलिसांनी ते उद्ध्वस्त केले. याप्रकरणी ८० जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी संवेदनशील अशा ५२४ ठिकाणी तपासणी केली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी ८६९ हॉटले आणि लॉजची पाहणी करण्यात आली.  पोलिसांनी शहरात एकाचवेळी १३९ ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी ९,६६१ वाहनांची तपासणी करून मोटारवाहन कायद्यान्वये १,९४६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १० जणांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.