आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण

तरुणाने मे महिन्यात सुट्टीकालीन खंडपीठासमोर ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल करून पत्नीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : आंतरजातीय विवाहामुळे जिवे मारण्याची धमकी मिळालेल्या तरुण जोडप्याच्या मदतीला उच्च न्यायालय धावून आले आहे. या जोडप्यासह तरुणाचे कुटुंब आणि त्यांच्या लग्नातील दोन साक्षीदारांना २४ तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

सामाजिक प्रतिष्ठेसाठी या जोडप्याला जीव गमवावा लागलेला आम्हाला नको आहे, असेही न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने जोडप्याला पोलीस संरक्षणाचे आदेश देताना प्रामुख्याने नमूद के ले. मुंबईचे रहिवासी असलेले हे जोडपे मूळचे गुजरातमधील बचाओ तालुक्यातील चौबारी गावचे आहे. तरुणी (२३) ही अहिर समाजाची असून तरुण (२२) ब्राह्मण आहे. तसेच तरुणी वाणिज्य शाखेची, तर तरुण व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा पदवीधर आहे.

तरुणाने मे महिन्यात सुट्टीकालीन खंडपीठासमोर ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल करून पत्नीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावेळी तरुणाकडे आपली छायाचित्रे असल्याने आपल्याला त्याच्याशी लग्न करावे लागल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने तरुणाची याचिका फेटाळली होती. परंतु नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी हे जोडपे पुन्हा न्यायालयासमोर हजर झाले आणि त्यांच्यावर बेतलेली कहाणी न्यायालयाला सांगितली. त्यांना तातडीच्या संरक्षणाची गरज असल्याचे लक्षात आल्यावर न्यायालयाने दोन महिला वकिलांना त्यांच्यासाठी याचिका तयार करण्याची सूचना केली. त्याच वेळी पोलीस आयुक्त, परिमंडळ-१०चे उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांना या जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश दिले. शिवाय या जोडप्याविरोधात तरुणीच्या कुटुंबाने, समुदाय प्रमुख वा तिच्या बळजबरीने लग्न झालेल्या पतीने कारवाईची मागणी केल्यास त्याची प्रत न्यायालयात सादर करण्याचे आदेश गुजरात पोलिसांना दिले.

प्रकरण काय?

या जोडप्याने के लेल्या याचिके नुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये दोघेही पळून गेले होते आणि दहा दिवसांनी पुन्हा मुंबईत परतले होते. मार्च २०२० मध्ये तरुणीला तरुणाविरोधात अपहरण आणि बलात्काराची तक्रार दाखल करण्यास भाग पाडण्यात आले. परिणामी पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर या तरुणाला साडेचार महिने कारागृहात राहावे लागले होते. तर तरुणीला पुन्हा गुजरातला नेऊन तिचा दुसऱ्या तरुणाशी बळजबरीने साखरपुडा करण्यात आला. डिसेंबर महिन्यात मुंबईत परतल्यावर तरुणीने पुन्हा या तरुणासोबत ठाणे येथे जाऊन लग्न केले. त्यानंतर पाच दिवसांनी समुदायाच्या प्रमुखांनी तरुणीला चौबारीला नेण्यास सांगितले. तेथे पुरुषांच्या जमावाने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिचे बळजबरीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न लावण्यात आले. तिला विकल्याचे सांगत त्याने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले.

पोलिसांचा तक्रार दाखल करून घेण्यास नकार

संधी मिळताच तरुणी १३ ऑगस्टला त्याच्या तावडीतून पळाली आणि मुंबईला आली. येथे आल्यावर ती पवई येथील याचिकाकत्र्याच्या घरी गेली. परंतु त्यानंतर दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या या जोडप्याने संरक्षणासाठी आधी पवई पोलिसांत धाव घेतली. मात्र प्रकरण गुजरातचे असल्याने जोडप्याच्या तक्रारीची दखल घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे दोघांनी अखेर न्यायालयाचे दार ठोठावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police protection for interracial couples interracial marriage akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या