नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये ६५ आणि ६२ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. पीडित मुलीचे बालसुधारगृहात समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने हा प्रकार तेथील अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भांडूप पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> मुंबई : प्रवाशांना मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करता येणार

तक्रारदार मुलगी नऊ वर्षांची असून एका स्वयंसेवी संस्थेमार्फत तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दोन आरोपी पीडित मुलीला भेटण्यासाठी सुधारगृहात आले होते. त्यांनी आपण मुलीचा सांभाळ केल्याचे सांगितले. पण त्यांच्या वागण्यावरून सुधारगृहातील महिला अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी पिडीत मुलीचे समुपदेशन केले व विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनांची माहिती तिने दिली.

हेही वाचा >>> मुंबई : पोलिसांना मारहाण करणाऱ्या ‘सीआयएसएफ’च्या जवानांना अटक

पीडित मुलीच्या आईला अंमलीपदार्थांचे व्यसन असल्यामुळे तिची आजी (आईची आत्या) तिला तेथून घेऊन भांडुपमध्ये आली होती. तेथे ६५ वर्षीय व्यक्तीच्या घरी पीडित मुलीला ठेवले होते. आरोपी तिच्यावर दिवसाआड लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने सांगितले. पीडित मुलीची आजी एका व्यक्तीकडे काम करीत होती. या व्यक्तीने आपल्या घराशेजारी राहण्यासाठी त्यांना जागा दिली होती. तेथे पीडित मुलगी आजीसोबत राहू लागली. त्यावेळी मालकाच्या घरी एक ६२ वर्षीय व्यक्ती येत-जात होती. आजी घरात नसताना ही व्यक्ती आपल्यावर अत्याचार करीत होती, असे पीडित मुलीने सांगितले. याशिवाय पीडित मुलीच्या घरी एक व्यक्ती आली होती. त्याला राहण्यासाठी जागा नसल्यामुळे पीडित मुलीच्या आईने त्याला घरात राहण्यासाठी परवानगी दिली होती. रात्री त्या व्यक्तीने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केले. त्याची मााहिती पीडित मुलीने आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बालसुधारगृहातील महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अखेर भांडूप पोलिसांनी दोन वृद्ध व्यक्तीसह एका अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.