police request court to issue non bailable arrest warrant against rana couple zws 70 | Loksatta

‘राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही’ ; अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची पोलिसांची न्यायालयात मागणी

राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली.

‘राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही’ ; अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची पोलिसांची न्यायालयात मागणी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या नावे अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात केली. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा असल्याचा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी करताना सरकारी पक्षाने केला.

राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु ते दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. दोघे एकदाही सुनावणीला उपस्थित राहिलेले नाहीत. राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. त्यांना आता कोणीच काही करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला. मागील सुनावणीच्या वेळीही राणा दाम्पत्याचा वकील उपस्थित नसल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर राणा दाम्पत्याला न्यायालयाबाबत आदर नसल्याचा सरकारी वकिलांचा दावा चुकीचा असल्याचे सांगून राणा दाम्पत्याच्या वकिलांनी प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-08-2022 at 05:40 IST
Next Story
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनिश्चितता ; तयारी पूर्ण; पण न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा