मूल पळविण्याचा एका महिलेचा प्रयत्न माटुंगा पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे फसला. पोलिसांनी या महिलेला अटक करून तिने पळवून आणलेल्या तीन महिन्यांच्या मुलाची सुटका केली.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास माटुंग्याच्या ग्रीन ग्रास परिसरात एक महिला एका बाळाला घेऊन जात होती. तिच्या हातात गोंडस बाळ पाहून तेथे बंदोबस्तावर असलेले माटुंगा पोलीस ठाण्याचे जाधव आणि साळवे या पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत तिने बाळ पळवून आणल्याचे सांगितले. या महिलेचे वय ३५ वर्षे असून ती बिहारमधील आहे. नेमके कुठून बाळ पळवले ते तिने सांगितले नाही. पोलिसांनी बाळाला देखभालीसाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) ठेवले आहे. ज्या कुणाला या बाळाबाबत माहिती असेल त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक काकड यांनी केले आहे. पोलीस या महिलेकडे कसून चौकशी करत असून तिने यापूर्वी किती मुलं पळवली आहेत, ती कुठल्या टोळीशी संबंधित आहे का त्याचा शोध घेण्यात येत आहे.