१३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : गोरेगाव पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाझेने सट्टेबाजांकडूनही खंडणीची रक्कम घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत वाझेंची चौकशी करण्यात येत असून गुन्हे शाखेने वाझेच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत.

वाझे यांनी खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन सट्टेबाजांकडून पैसे घेतल्याचा संशय असून याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत. ही रक्कम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी वसूल करण्यात आल्याचा संशय गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे.

या प्रकरणी वाझे यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच वाझे यांचे मेमरी कार्डही पोलिसांनी जप्त केले असून त्याच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी लवकरच एका साक्षीदाराची साक्ष कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांच्या समोर नोंदवण्यात येणार आहे.

गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डराने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझे यांना आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणी आतापर्यंत वाझेंसह तिघांना अटक करण्यात आली  आहे.