मुंबापुरीत सरत्या वर्षांला निरोप देत नव्या वर्षांचे स्वागत करताना मद्यप्राशन करण्याची प्रथा रूढ होत असताना दारू पिऊन वाहन दामटविणाऱ्यांचे प्रमाणही कमी होताना दिसत नाही. अशाच तळीरामांविरोधात वाहतूक पोलिसांनी यंदाही कारवाई केली. यात तब्बल ७०५ तळीरामांवर कारवाईचा ‘दंडु’का उगारण्यात आला आहे. यात ३२ महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. नाताळच्या आगमनापासून ते नववर्ष उजाडेपर्यंत नशेत गाडी चालवण्याची संख्या १३४७वर पोहोचली आहे.
मुंबईत नववर्षांपूर्वी रिसॉर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये पार्टीसाठी गर्दी केली जाते. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण अधिक वाढत आहे. यात १८ वर्षांच्या तरुणांसह ५५ वर्षांच्या प्रौढांपर्यंत सारेच पार्टीच्या जोशात असल्याने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असतात. हेल्मेट न घालणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मित्रांसोबत शर्यत लावणे, यात गाडी बेदरकारपणे चालवणे, भररस्त्यात गाडी पार्क करणे आदी प्रकार प्रत्येक वर्षी घडत असतात. याच धर्तीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून ९० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
पार्टीनंतर मुंबईकरांना नव्या वर्षांत ‘जेल’ची हवा खावी लागू नये याकरिता वाहतूक पोलीस वेळोवेळी मद्यप्राशन करून गाडी चालवू नका, असे आवाहन करत होते. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष करत नशेत गाडी चालवून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक खात्याकडून खासगी कंपन्या, महाविद्यालयांमध्ये जागृती शिबिरे घेतली जाणार आहेत. तसेच पोलिसांकडून कारवाईची मोहीमदेखील राबण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नशेत वाहन चालवणे – ७०५
बेदरकार वाहन चालवणे – ५९
बेकायदेशीर वाहन चालवणे – ११३५
हेल्मेट न घालणे – १९०६