मुंबई : मुंबईमध्ये वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या पर्यायाला पसंती मिळू लागली असून या वाहनांच्या खरेदीमध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र, या वाहनांची बॅटरी चार्ज करण्यासाठी स्वतंत्र धोरणच नाही. त्यामुळे या वाहनांचा वापर, बॅटरी चार्जिग आदींबाबत संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पालिकेने आता नवीन धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे.
पर्यावरणपूरक अशा विजेवर धावणाऱ्या वाहनांना मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही वाहने खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. सरकारी यंत्रणांच्या ताफ्यात विजेवर धावणारी वाहने समाविष्ट करण्यात येत असून आता नागरिकही मोठय़ा प्रमाणावर विजेवर धावणाऱ्या वाहनांकडे वळत आहेत. मात्र अशा खासगी वाहनांचे चार्जिग करण्याबाबत अद्याप कोणतीही नियमावली नाही. या वाहनांना आगी लागण्याचे प्रकार टाळण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. त्यामुळे पालिकेने आता नवीन धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई महानगरात विद्युत वाहनांच्या वापरास गती देणे, तसेच या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागांतर्गत ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता या संदर्भात धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांबाबत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.
काही वेळा इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिग स्टेशनमध्ये भडका उडत असल्याचे प्रकार घडत आहेत. इलेक्ट्रिक गाडय़ांमध्ये आग का लागते, चार्जिग स्टेशनची सुरक्षा याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. या प्राथमिक बैठकीला पालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेस्ट उपक्रम, महावितरण, नरेडको, क्रेडाई इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.