उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील वातावरणाचे वर्णन फक्त एकाच शब्दात व्हावे – महाबजबजपुरी!  उमेदवारांची पळवापळव, ‘आयातोबां’ना दिलेली उमेदवारी, त्यामुळे अखेरच्या क्षणी झालेली पक्षांतरे, उमेदवारीचा घोळ हेच या दिवसाचे चित्र होते. युती आणि आघाडीत काडीमोड झाल्यानंतर निर्माण झालेला कालचा गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ सर्वच पक्षांतील आयाराम-गयारामांनी आणि बंडखोरांनी आज राज्यातील सुजाण मतदार बंधु-भगिनींवर आणली! भाजपने तर हाती आला तो पावन केला अशा पद्धतीनेच अनेक मतदारसंघांत उमेदवार निवडले. ठाणे, नवी मुंबईपासून विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र असे सगळीकडे हेच चित्र दिसत होते.
शिंदेशाहीविरोधात संताप
परपक्षातील आयारामांना आपले म्हणत जिल्ह्य़ातील तिकीटवाटपात निष्ठावंतांना डावलणारा िशदे पॅटर्न ठाण्यातील शिवसेनेसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरू लागला असून शिवसेनेतील बंडोबांनी शनिवारी दिवसभर सेनानेत्यांना अक्षरश सळो की पळो करून सोडले. एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी बंड पुकारून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कल्याण ग्रामीण मतदारसंघातून रमेश म्हात्रे यांनीही भाजपला आपलेसे करत शिवसेनेतील िशदेशाहीला आव्हान उभे केले. कल्याण, डोंबिवलीत शिवसेनेत एकंदरच जोरदार लाथाळ्या सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेत राऊळ यांचे बंड
शिवसेना आमदार विनोद घोसाळकर त्रास देत असल्याच्या तक्रारी नगरसेविकांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना नेतृत्वाकडे केल्या होत्या. तरीही त्यांना दहिसरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बंड पुकारले. त्या आता घोसाळकर यांच्याविरोधात मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत.
गोंधळात गोंधळ
*माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज यांना दुपारनंतर उमेदवारी अर्ज भरण्याचा निरोप देण्यात आला. पण त्यांना मुदतीत पोहचणे शक्य झाले नाही.
*वहिनीला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने पर्यावरणमंत्री संजय देवतळे संतप्त झाले. त्यांनी थेट भाजपच्या गोटात प्रवेश केला आणि भाजपने त्यांना उमेदवारी देऊन टाकली.
*नारायण राणे यांचे पुत्र नीतेश, माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल आणि अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांना अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आधी काही काळ उमेदवारी देण्यात आली.
भाऊबंदकीचा भाजपला आधार : ऐरोलीत  चुलत भाऊ संदीप नाईक यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने शिवसेनेचे युवा नेते वैभव नाईक संतापले होते. दोघांनीही एकमेकांचा फायदा घेतला. भाजपने वैभव नाईक यांना उमेदवारी दिली. येथे शिवसेनेने विजय चौगुले यांना उमेदवारी दिली आहे.