लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या भाडेवाढीला मुंबई महापालिकेने मंजुरी दिल्याचे वृत्त येताच राजकीय पक्षांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे. शिवसेना (ठाकरे), समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र बेस्टला तारण्यासाठी या भाडेवाढीची गरज असल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पाठवलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या किमान सात आठ वर्षांपासून न झालेली भाडेवाढ करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेने मंजुरी दिली तरी या प्रस्तावाला आता राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच ही भाडेवाढ लागू होऊ शकणार आहे. ही भाडेवाढ लागू झाल्यास मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत. पाच रुपयांचे किमान तिकीट आता दहा रुपये होणार आहे. तर वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये होणार आहे.

बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाही. बेस्ट उपक्रमाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र ही भाडेवाढ लागू होण्याआधीच राजकीय पक्षांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये बेस्टच्या प्रवासी भाड्यात कपात करण्यात आली होती. त्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले पण बेस्टचा महसूल कमी झाला. पालिकेच्या अनुदानानेही बेस्टची आर्थिक स्थिती सुधारत नाही. त्यामुळे भाडेवाढ करत असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेस्ट बससेवेकडे सत्ताधारी गेली २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत. महत्त्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यापेक्षा इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या. -आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

इतर महापालिकांच्या परिवहन बसगाड्यांचे भाडे

शहर परिवहन संस्थाकिमान प्रवास भाडे
बेस्ट उपक्रम (मुंबई)५ रुपये
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम ७ रुपये
ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रम ७ रुपये
मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रम६ रुपये