मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता प्रचारसभांसाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून विविध राजकीय पक्षांनी आपापले अर्ज सादर केले आहेत. निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यापूर्वी तीन – चार दिवसांसाठी शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे यांनी आपापले अर्ज केले आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून निवडणूकीसाठी सोमवारी १५ डिसेंबरला आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूकीसाठी केवळ एक महिना उरला असून या कालावधीत जागा वाटप, नामनिर्देशन अर्ज भरणे, घरोघरी प्रचार यानंतर जाहीर सभा होणार आहेत. त्याकरीता राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातही दादरचे शिवाजी पार्क हे मैदान मोठे असून मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी आहे. मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्येही चुरस असते. त्यामुळे मतदानाच्या दोन – तीन दिवस आधी प्रचार सभेसाठी परवानगी मिळावी याकरीता शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या तीन पक्षांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना (शिंदे) पक्षाने ११,१२,१३ जानेवारी यापैकी एका दिवसासाठी परवानगी अर्ज दिला आहे. तर १२ जानेवारीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने अर्ज दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ११ जानेवारीला प्रचारसभेसाठी अर्ज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व अर्जांवर मुंबई महापालिका प्रशासन निर्णय घेऊन परवानगी देणार आहे. मात्र, तोपर्यंत परवानगी मिळावी याकरीता मोठे राजकारण रंगणार यात शंका नाही. तसेच मनसे आणि शिवसेना (ठाकरे) बंधूंची एकत्र जाहीर सभा होणार का याबाबतही उत्सुकता आहे.
शिवाजी पार्क मैदान आणि राजकीय सभा यांचे जुने नाते आहे. त्यातही शिवसेनेचे या मैदानाशी अधिकच जवळचे नाते आहे. मात्र शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर सभा घेता यावी यासाठी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रत्येक निवडणूकीच्यावेळी चुरस असते. प्रचाराची सांगता शिवाजी पार्क मैदानात करता यावी म्हणून ११,१२ व १३ जानेवारीच्या तारखांना अधिक मागणी आहे. दरम्यान, याबाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
