मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत असून वांद्रे-कुर्ला संकुलातील शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी एक लाख खुच्र्याची व्यवस्था आहे, तर शिवसेनेच्या शिवाजी पार्कमधील मेळाव्यात ४० हजार खुर्च्या असतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. पोलिसांच्या अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी होईल, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी केला, तर शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरून बाहेरही कार्यकर्ते उभे असतील, असे शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. यावरून गर्दी कोणत्या मेळाव्यात अधिक होणार यावरून दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

हेही वाचा >>> देवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला

शिंदे गटाने राज्यभरातून चार हजारांहून अधिक बसगाडय़ांची व्यवस्था कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी केली आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलातील सर्व मैदाने वाहने उभी करणे व अन्य व्यवस्थेसाठी घेतली आहेत. मैदानात चिखल व गवत वाढले असून ते साफ करण्याची कामे सुरू असून अधिकाधिक खुच्र्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न आहेत. युवासेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाबरोबर आले असून त्यांच्यावरही तयारीची जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्या पक्षाचे सर्व मंत्री व नेते मेळाव्यास असतील व ते अनुभव सांगतील. जर ते निष्ठावान नसते, तर सत्ता स्थापनच झाली नसती. तिकडे रंगीत तालीम सुरू आहे, मेळावा हा आमच्यासाठी ‘इव्हेंट’ नाही, असे पावस्कर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे केंद्रीय नेते दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार की नाहीत, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> शिंदे गटातही घराणेशाही; ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना युवासेनेच्या कार्यकारिणीत स्थान

नेहमीसारखीच गर्दी होईल: शिवसेनेचा दावा

शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याची अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे. तो आमच्यासाठी ‘ इव्हेंट ’ नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ज्याप्रमाणे हजारो शिवसेना कार्यकर्ते मेळाव्यासाठी येत होते, त्याच पद्धतीने आताही ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येतील. त्यावेळी जशी गर्दी असायची, तशी यंदाही असेल. मैदान पूर्ण भरून बाहेरही अनेक कार्यकर्ते उभे असतील. ज्यांना गर्दीचे आकडे मोजायचे असतील, त्यांनी मोजावेत, असा टोला शिवसेनेचे अनिल परब यांनी लगावला. वांद्रे-कुर्ला संकुलात एक लाख खुच्र्याची व्यवस्था असेल आणि चार-पाच हजार बसगाडय़ा येणार असतील, तर त्यामधून आणि मुंबई परिसरातून येणारे कार्यकर्ते गृहीत धरले, तर ही संख्या अडीच-तीन लाखांच्या घरात जाते. त्यांना कुठे बसविणार, असा प्रश्न शिवसेना नेत्यांकडून उपस्थित केला असून गर्दीची आकडेवारी फुगविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी  

‘शिवसेनेच्या विचारांची नक्कल कशी करणार?’

शिवसेनेने समाजमाध्यमांवर दसरा मेळाव्याबाबतची झलक चित्रे प्रदर्शित करण्यात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तरदाखलचे टीझर्स प्रदर्शित केले. त्यावर जमाना नक्कल करण्याचा असला तरी शिवसेनेच्या विचारांची नक्कल कशी करणार, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला. शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांविरोधातील चीड व संताप मेळाव्यात व्यक्त होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे यांच्यानंतर शिंदे यांचे भाषण? 

दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात भाषणांवरून कुरघोडी होण्याची चिन्हे आहेत. शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण करावे, अशी शिंदे गटाची योजना आहे. म्हणजेच ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देता येईल. ठाकरे भाषण रात्री आठच्या सुमारास सुरू होते व नऊपर्यंत पूर्ण होते. रात्री ९ नंतर शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करण्याची योजना आहे.