मुंबई : प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्यानंतर पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाला ९९ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तसेच अजून एक नियमित फेरी आणि संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने यंदा गेल्या वर्षीच्या सुमारे १ लाख ७ हजार अंतिम प्रवेशांचा विक्रम सहज मोडण्याची शक्यता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुरूप करण्यात आलेल्या व्यापक बदलांमुळे विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण मंडळाने ५१ पदविका अभ्यासक्रमांची पुनर्रचना करून त्यांना अधिक उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित स्वरूप दिले आहे. नवीन अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, पायथॉन प्रोग्रामिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ५ जी, यूआय/यूएक्स डिझाइन यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक सत्रात मायक्रो प्रोजेक्ट आणि अंतिम वर्षात कॅपस्टोन प्रोजेक्ट अनिवार्य करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगांशी जोडण्यात आले आहे. यासोबतच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांत शिक्षण व परीक्षा देण्याची सुविधा, मल्टिपल एंट्री-एक्झिट व्यवस्था, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स , स्कूल कनेक्ट कार्यक्रम, उत्कृष्टता केंद्रे, डिजिटल परीक्षा प्रणाली आणि ‘डिप्लोमा साथी’ ‘एआय-आधारित व्हॉट्सॲप’ सेवा यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही पॉलिटेक्निककडे ओढा वाढला आहे.

पसंतीक्रम भरलेल्या ७७.२० टक्के विद्यार्थ्यांना संधी

यंदा राज्यातील ४४८ संस्थांमध्ये १ लाख ३८ हजार ९०७ जागा उपलब्ध आहेत. तिसऱ्या फेरीअखेरीस ९९ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७७.२० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. तर ९ हजार ८७ विद्यार्थ्यांना पहिल्या ते सहाव्या पसंतीतील अभ्यासक्रम मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाखांमध्ये प्रवेश मिळण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या फेरीमध्ये ९ हजार ४८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे यंदा तिसऱ्या फेरीमध्येच एक लाखांच्या जवळपास प्रवेश पोहचले आहेत.

प्रवेशाची आकडेवारी

कॅपमधील संस्था – ४४८ एकूण प्रवेशक्षमता – १,३८,९०७

झालेले प्रवेश

कॅप फेरी-१ – ५८,१३६ कॅप फेरी-२ – ३२,१५९ कॅप फेरी-३ – ९,४८३ एकूण प्रवेश – ९९,७७८