scorecardresearch

विद्यापीठात पाणथळीवर भराव

पाच हजारांहून अधिक झाडे आणि जैवविविधतेचा वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठात पाणथळ क्षेत्रावर भराव घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

चित्रीकरणासाठी दिलेल्या जागेत बांधकामामुळे जैवविविधतेला धोका

नीलेश अडसूळ

मुंबई : पाच हजारांहून अधिक झाडे आणि जैवविविधतेचा वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठात पाणथळ क्षेत्रावर भराव घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. चित्रीकरणासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेत हे पाणथळ क्षेत्र असून त्यावर भराव टाकून बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जैवविविधता अहवालात पाणथळ क्षेत्राची नोंद असतानाही विद्यापीठाने ही जागा भाडय़ाने दिली. त्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे.  

मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल कुर्ला आणि सांताक्रूझ या दोन विभागांच्या मध्यभागी आहे. तसेच मिठी नदी आणि त्यातून वाहणारा वाकोला नाला हा कलिना संकुलापासून जवळ आहे. परिणामी, क्रीडा संकुलासमोरील (हयात गेटकडील) जागेत पाणथळ क्षेत्र निर्माण झाले आहे. अद्याप या क्षेत्राची नोंद झालेली नव्हती. परंतु गेल्या वर्षी सादर केलेल्या जैवविविधता अहवालात या क्षेत्राबाबत संशोधन करून विस्तृत माहिती देण्यात आली असून त्याचे क्षेत्रफळ ०.१५ चौरस किलोमीटर इतके आहे. याबाबत विद्यापीठाला पूर्ण कल्पना असतानाही नोव्हेंबर २०२१ मध्ये पाणथळ क्षेत्राचा समावेश असलेली पाच एकर जागा एका निर्मिती संस्थेला चित्रीकरणासाठी देण्यात आली. चित्रीकरण सुरू झाले असून डांबराचे रस्ते आणि इतर बरेच बांधकाम करण्यात आले आहे. ‘या प्रकाराने विद्यापीठातील जैवविविधतेला धक्का बसला असून पाणथळ क्षेत्रावर भराव घातल्याने पावसाळय़ात विद्यापीठात पाणी साचण्याचे प्रमाण वाढेल,’ असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाची प्रतिक्रिया वारंवार प्रयत्न करूनही मिळू शकली नाही. 

   याविषयी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी केंद्रे म्हणाले,  विद्यापीठ अशा महत्त्वाच्या जागा भाडय़ाने देऊन जैवविविधतेला धक्का लावत आहेत. येथे भराव घालून चित्रीकरण सुरू आहे. हा भूखंड भाडय़ाने देतानाच कुलसचिवांना याबाबतचे पत्र दिले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  गेटपासूनचे बरेच मोठे क्षेत्र हे पाणथळ जमिनीचे आहे. त्या ठिकाणी अनेक पक्षी, प्राणी येत होते. सध्या चित्रीकरणस्थळी मोठी वाहने, जनरेटर, क्रेन आणि बाहेरील माणसे येत असल्याने विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागले आहे. 

पाणथळ क्षेत्र म्हणजे? 

जमीन आणि पाणी यांचा समन्वय साधण्याचे काम या जागा करतात. नैसर्गिक स्रोतांमधून वाहणारे किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जमिनींमध्ये असते. पाणथळ क्षेत्रांमुळे पूरस्थिती आटोक्यात येते किंवा पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होते. अशा नैसर्गिक पाणथळींवर पक्षी, कीटक, जलचर अशी जैवविविधता समृद्ध होत असते. विद्यापीठाच्या संकुलात जैवविविधता मोठय़ा प्रमाणात असून येथील पाणथळ हे त्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते. विद्यापीठाच्या संकुल परिसरात ६४हून अधिक प्रजातींचे पक्षी, दुर्मीळ वनस्पती, झाडे, १० प्रकारच्या मुंग्या, चतुर, टोळ, भुंगे, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळल्याचे राष्ट्रीय विद्यान दिनानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात नमुद करण्यात आले आहे. 

चित्रीकरण कशाचे?

विद्यापीठाने हा भूखंड सिद्धेश एण्टरप्रायजेस या कंपनीला भाडे कराराने दिला आहे. या करारांतर्गत यशराज फिल्म ही निर्मिती संस्था भोपाळ दुर्घटनेवर आधारित वेबमालिकेचे चित्रीकरण करीत आहे. या जागेवर सध्या भोपाळ रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानाकातील पादचारी पूल यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रेल्वेचे डबे, क्रेनही चित्रीकरणस्थळी आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pool university threat construction space provided filming ysh

ताज्या बातम्या