ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी ही आत्या असलेल्या आणि ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या मातब्बर उमेदवार प्रिया दत्त यांचा तब्बल एक लाख ८७ हजार मतांनी पराभव केला. तर मुंडे यांना मात्र तेवढे मताधिक्य मिळविता आले नाही. त्यामुळे ‘मामांपेक्षा भाची सरस’ असा प्रत्यय आला.
मुंडे गेली ४० वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत, तर पूनम महाजन यांचे तेवढे वयही नाही. ईशान्य मुंबईत उमेदवारी नाकारल्यानंतर प्रिया दत्त यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवारापुढे भाजपला अन्य कोणीही उमेदवार न मिळाल्याने पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. ही जागा हमखास पडणार, अशी खात्री पक्षाच्याच अनेक वरिष्ठ नेत्यांनाही होती. अगदी प्रचाराची सांगता होत असतानाही आता चांगली लढत होईल, एवढीच प्रगती झाल्याचे ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते. पण ‘कोणताही पराभव कधीच अंतिम नसतो’, हा संदेश अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांचे सरकार सत्तेवरून गेल्यानंतर भाजपने कार्यकर्त्यांना दिला होता. प्रमोद महाजन यांनीही त्यानुसारच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन संघटनेची बांधणी केली होती. त्यांच्याच कन्या असलेल्या पूनम यांनीही आपल्या विधानसभेच्या पराभवानंतर खचून न जाता या संदेशातून प्रेरणा घेतली आणि पदरात पडलेल्या उत्तर-मध्य मतदारसंघात कसून मेहनत केली. शून्यातूनच सारे काही साकारल्याने गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे सर्वशक्तीनिशी त्यांनी लढत दिली आणि मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठवीत विजय संपादन केला.
त्याउलट बीडमधील विजयाबाबत मुंडे खात्री देत असले तरी चिंतित होते. ‘मुंडे विरुद्ध पवार’ अशी लढाई तेथे झाल्याने आणि मराठा विरुद्ध अन्य असे मतदारांचे धुव्रीकरण झाल्याचे दिसून आल्याने मुंडे यांच्या पराभवाची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यांचे हे अंदाज मुंडे यांनी साफ चुकविले. मात्र देशात सर्वाधिक मते व मताधिक्य मिळविण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरविणे त्यांना शक्य झाले नाही. आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा सर्वाधिक कष्ट त्यांना या निवडणुकीतील विजयासाठी घ्यावे लागले.