Hotshots App च्या डाउनलोड्समधूनच कुंद्रांनी कोट्यावधी कमवले; पोलिसांनी न्यायालयाला सांगितला कमाईचा आकडा

कुंद्रा यांनी गुगलच्या प्लॅटफॉर्मवरील डाऊनलोडच्या माध्यमातूनही बराच पैसा कमवल्याचा शक्यता मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर व्यक्त केलीय

Raj Kundra
न्यायालयासमोर पोलिसांनी दिली माहिती
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा हे मुख्य आरोपी असणाऱ्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करत आहेत. हॉटशॉट्स या अ‍ॅपच्या माध्यमातून कुंद्रा यांनी ऑगस्ट २०१९ ते जुलै २०२० दरम्यान अ‍ॅपलच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या डाउनलोड्समधून १ कोटी १७ लाख रुपये कमवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच कुंद्रा यांनी गुगलच्या प्लॅटफॉर्मवरील डाऊनलोडच्या माध्यमातूनही पैसा कमवल्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. याचसंदर्भातील तपासासाठी त्यांनी  कुंद्रा यांची सात दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये केली होती. मात्र न्यायालयाने कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

नक्की वाचा >> शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाही; शर्लीन चोप्रासंदर्भातही मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यूट्यूब, गुगल आणि अ‍ॅपलने हॉटशॉट्स या अ‍ॅपवर कारवाई केल्यानंतर कुंद्रांनी बॉलीफेम नावाचं नवीन अ‍ॅप लॉन्च केल्याचं म्हटलं आहे. तसेच कुंद्रा यांच्याशीसंबंधित १ कोटी १३ लाख रुपये असणारं एक बँक खातं गोठवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल कंपनीकडून कुंद्राला १ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर गुगल प्लेस्टोरवरील अ‍ॅपचे त्याचे सर्वाधिक वापरकर्ते होते. त्यातून गुगलकडून मोठा महसूल त्याला मिळाल्याची शक्यता आहे. तसेच या हॉटशॉट्स अ‍ॅपची पोर्नोग्राफिक संकेतस्थळावर जाहिरात करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुगलचा प्लॅटफॉर्म अधिक लोकप्रिय असल्याने गुगलवरुन हे अ‍ॅप डाउनलोड करुन अ‍ॅपलच्या प्लॅटफॉर्मवरील कमाईपेक्षा कुंद्रांनी अधिक पटीने कमाई केली असेल असा अंदाज आहे. गुगलला ईमेलच्या माध्यमातून यासंदर्भातील तपशील देण्याची विनंती करण्यात आल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये प्रदीप बक्षी (म्हणजेच राज कुंद्रांचा मेहुणा) याच्या नावाखाली कुंद्राच हॉटशॉट्सचे सर्व व्यवहार पाहत होते अशी शंका पोलिसांना आहे. कुंद्रांच्या अटकेनंतर अनेकांनी पुढे येऊन त्यांच्याविरोधात पोलिसांकडे जबाब नोंदवलाय, असंही पोलीस म्हणालेत.

नक्की वाचा >> राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

हॉटशॉट्सची मालकी ही बक्षींच्या मालकीच्या केनरीन कंपनीकडे असून या कंपनीची नोंदणी युनायटेड किंग्डममधील आहे. मात्र कुंद्रा हे स्वत: पॉर्न व्हिडीओ बनवणे आणि त्याचं वितरण करण्यामध्ये सहभागी असल्याची पोलिसांना शंका आहे. कुंद्रा यांनी त्यांच्या कंपनीच्या टेक विभागाअंतर्गत अनेक अ‍ॅप्लिकेशन्स डेव्हलप केले. त्यामध्येच हॉटशॉट्सचाही समावेश होता जे नंतर बक्षींच्या कंपनीला विकण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. कुंद्रा यांनी हॉटशॉट्स हे अ‍ॅप विकल्यानंतरही त्याच्यासंदर्भातील काम आपण सहभागी होतो असं सांगितलं आहे. तरी या अ‍ॅपची सर्व जबाबदारी माझा पीए उमेश कामत याच्याकडे होती असंही कुंद्रा म्हणालेत. कामतला फेब्रुवारीमध्ये याच प्रकरणात अटक करण्यात आलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pornography case mumbai police say hotshot app raj kundra got rs 1 crore 17 lakhs in a year scsg