मुंबई : मानखुर्द परिसरात १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन मुलाला घरी बोलावून अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तरुणीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मानखुर्द परिसरात तरुणीनेच लहान मुलावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकारामुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत.

पीडित मुलगा आणि तरुणी एकाच परिसरात वास्तव्यास असून काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपी तरुणीने दहावीत शिक्षण घेत असलेल्या या मुलाला घरी बोलावून त्याच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. तरुणी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती तरुणी आणि मुलाच्या घरी समजली. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मानखुर्द पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोस्को) तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.