पंधरा दिवसांच्या सुट्टीनंतर परतलेल्या पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला झोडपले. नाशिक, रायगड, रत्नागिरी येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई उपनगरातही पावसाच्या काही जोरदार सरी आल्या. शनिवार व रविवारीही मुंबईसह कोकण परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी येतील. मराठवाडा व विदर्भाला मात्र पावसाच्या तुरळक सरींवर समाधान मानावे लागेल.
पश्चिम किनारपट्टीवर व विशेषत गुजरातच्या दक्षिणेला कमी दाबाचे क्षेत्र असल्याने मुंबईत व कोकणात सोसाटय़ाच्या वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. किनारपट्टीवरील बहुतांश भागात पावसाच्या मुसळधार सरी आल्या. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात मुंबईत सांताक्रूझ येथे २६ मिमी तर कुलाबा येथे ३१ मिमी पाऊस पडला. कोकण किनारपट्टीवर पुढील आठवडाभर पाऊस मुक्कामाला राहण्याची शक्यता असून शनिवारी व रविवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. १८ जुलैनंतर मोसमी वाऱ्यांचा पुढचा टप्पा अपेक्षित असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.