मुंबई : आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील तब्बल ५५६ कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवा निवृत्त झाले असून बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागातील सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. परिणामी, भविष्यात बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. सध्या परिवहन विभागातील १६ हजार कर्मचारी असून यात वाहक, चालकाचा समावेश आहे. मात्र, जुलै महिन्यापर्यंत शेकडो कर्मचारी सेवा निवृत्त होत असून बेस्टच्या बसचे चाक कर्मचाऱ्यांअभावी थांबण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरात धावणाऱ्या बेस्टचा प्रवास स्वस्तात, वेगात आणि गारेगार होत आहे. सध्या बेस्ट बसमधून ३२ ते ३५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. परंतु, बेस्टच्या स्वमालकीच्या बस झपाट्याने कमी होत असल्याने बसची संख्या कमी होत आहे. बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्यांचा ताफा राखण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने निधी देणे आवश्यक आहे. स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या नाहीत, तर, मार्च २०२७ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या बसगाड्याच उरणार नाहीत. तर, येत्या काळात बेस्टच्या परिवहन विभागातून निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. येत्या काळात कर्मचाऱ्यांची भरती न केल्यास बेस्टच्या बस चालवण्यास चालक व वाहकांची कमतरता भासेल. याचा थेट फटका प्रवासी वर्गाला बसेल.

हेही वाचा – दहावी – बारावीनंतरचे विविध अभ्यासक्रम व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन, ठाण्यात ८ व ९ जून रोजी करिअरच्या संधींचा भविष्यवेध

हेही वाचा – अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार

प्रवाशांना अवेळी बस फेऱ्या, बसची वारंवारता कमी असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागेल. बेस्टच्या परिवहन विभागात एकूण १६ हजार ५७७ कर्मचारी होते. मात्र, मे महिन्यात बेस्टच्या संपूर्ण विभागातील ५५६ कर्मचारी निवृत्त झाले. निवृत्त झालेल्यांमध्ये ५० टक्के कर्मचारी परिवहन विभागातील आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली असून, येत्या काळात ही संख्या आणखी खालावणार आहे. तसेच जुलै महिन्यापर्यंत बेस्ट उपक्रमातील सर्व विभागांतील २६१ कर्मचारी निवृत्त होत असून यामध्येही चालक, वाहकांची संख्या अधिक आहे, असे बेस्ट उपक्रमातील सूत्रांनी सांगितले.