महाराष्ट्राची राजधानी असलेल्या आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल भागात राहणाऱ्या एका तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेत आयुष्य संपवलं आहे. स्तुती असं मृत तरुणीचं नाव आहे. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांना मिळाली सहा पानांची सुसाईड नोट

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्तुती नवी मुंबईतल्या एका डेंटल मेडिकल कॉलेजमध्ये MDS चं शिक्षण घेत होती. या मुलीने ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सहा पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या सहा पानी सुसाईड नोटमध्ये स्तुतीने तिच्या बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत. बॉयफ्रेंड फजल मोहम्मद खान आपला छळ करायचा आणि चारित्र्यावर संशय घ्यायचा असं तिने म्हटलं आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख

अँटॉप हिल पोलिसांनी स्तुतीच्या आत्महत्येनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुसाईड नोटमध्ये या मुलीने लिहिलं आहे की तिचा बॉयफ्रेंड फझल मोहम्मद खान हा तिच्यावर गंभीर आरोप करायच्या, चारित्र्यावर संशय घ्यायचा. श्रद्धा वालकर प्रकरणामुळे सगळा देश हादरला होता. कारण त्या प्रकरणात श्रद्धाची हत्या तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच आफताब पूनावालाने हत्या केली होती. तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते आणि तो हळूहळू ते फेकून नष्ट करत होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे पोलिसांना फ्रिजमध्ये मिळाले होते. या प्रकरणाचा उल्लेखही स्तुतीने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

स्तुतीच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी वरळीतून केली अटक

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात फझल मोहम्मद खान या ३१ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सोमवारी म्हणजेच ९ मार्चला स्तुतीने आयुष्य संपवलं. फझल मोहम्मद आणि स्तुती यांची ओळख एका डेटिंग अॅपवरुन झाली होती. मागच्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण फझल तिला कायम त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता, या प्रकरणात आता त्याची चौकशी सुरु आहे. अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. The Tribune ने हे वृत्त दिलं आहे.

आत्महत्येच्या दिवशी काय घडलं?

स्तुती तिच्या आई वडिलांसह अँटॉप हिल भागात वास्तव्य करत होती. तिने ज्या दिवशी टोकाचं पाऊल उचललं त्यादिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत ती तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. घरातल्यांना वाटलं की ती बाहेर का येत नाही. दरवाजा तोडण्यात आला तेव्हा स्तुतीने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं. तिला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अँटॉप हिल पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे बॉयफ्रेंडची भूमिका नेमकी काय होती त्याचा तपास सुरु केला आहे. तसंच तिच्या कुटुंबाशी आणि मित्र परिवाराशी चौकशी करणं आणि त्यांचे जबाब नोंदवणं ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. स्तुतीने असंही लिहून ठेवलं आहे की तिच्या बॉयफ्रेंडकडून तिला जो त्रास दिला जात होता आणि छळ केला जात होता ते सगळे प्रकार तिच्या मित्र-मैत्रिणींना माहीत होते. ते तिला एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील असं चिडवत असत.