मुंबई : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील औषधालय भाडेतत्त्वावर देण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने या निविदेतील अटी वाजवी नसल्याचे मत व्यक्त करून आर्थिक निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. त्याचवेळी तांत्रिक निविदा प्रक्रिया सुरूच राहील, असे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील औषधालय गेल्या काही वर्षांपासून बंद असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी यासाठी जेनेरिक औषधालय सुरू करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. या निर्णयानुसार, पालिकेने रुग्णालयातील औषधालय भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढल्या आहेत. परंतु या निविदेतील अटी व शर्ती या वाजवी नसल्याचा आरोप करून रेणुका माळवदे आणि दिनेश भगनानी या कळवा परिसरातील औषधालय मालकांनी अ‍ॅड. अनंत वडगावकर आणि अ‍ॅड. सतीश इंगळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.