मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील मुघल राजवटीच्या तावडतीतून यशस्वी सुटका या ऐतिहासिक घटनेनिमित्त ‘शिवचातुर्य दिन’ आग्रा येथे साजरा करण्यात आला. यानंतर हा दिवस दरवर्षी ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सुटका करून स्वराज्याकडे परतण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘गरुडझेप मोहीम’ पुणे येथील संस्थेच्या वतीने आग्रा ते राजगड अशी सुमारे १ हजार ३१० किलोमीटरची पायी व सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे. उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, राज्याचे राजशिष्टाचार मंत्री मंत्री जयकुमार रावल, मंत्री भरतशेट गोगावले यांनी अधिकाऱ्यांसमवेत कोठी मीना बाजार परिसराची पाहणी केली. या स्मारकाच्या कामासाठी जागतिक किर्तीच्या प्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.