मुंबई : पवई येथील मोरारजी नगर परिसरातील जुन्या आणि नवीन भुयारी मार्गांचे रुंदीकरण करताना महानगरपालिकेची ३४ लाख ७० हजार रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेच्या जल अभियंता खात्यात कार्यरत असताना सहायक अभियंता अनिस अयुब खान यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची आणि कल्पकतेची महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विशेष दखल घेत त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे.
मोरारजी नगर परिसरात भुयारी मार्ग अरुंद असल्याने अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या होती. या समस्येवर उपाय म्हणून भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, परिसरातील मर्यादित जागा, विविध सेवावाहिन्यांचे जाळे आणि तांत्रिक अडचणी यामुळे हे काम आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत तत्कालीन सहायक अभियंता अनिस खान यांनी पुढाकार घेत प्रशासकीय समन्वय आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे हे काम पूर्ण केले. या कामादरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाशी संबंधित खर्चापोटी महापालिकेच्या ३४.७० लाख रुपयांची बचत झाली. अन्य सेवापुरवठादारांच्या बाबतीतही आर्थिक बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
भुयारी मार्गांच्या रुंदीकरणासोबतच पावसाच्या पाण्याचा निचरा, पादचाऱ्यांसाठी सुविधा आणि विविध केबलसाठी स्वतंत्र डक्टची व्यवस्थाही करण्यात आली. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. या कामात तत्कालीन कार्यकारी अभियंता सुभाष शिंदे, सहायक अभियंता अनिस खान, दुय्यम अभियंता महेंद्र दळवी आणि कनिष्ठ अभियंता संदीप राणे यांचा सहभाग होता. या सर्वांना अश्विनी भिडे यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला.
दरम्यान, म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष टी. व्ही. शाह आणि कार्याध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी संबंधित अभियंत्यांचे अभिनंदन केले. मुंबई महापालिकेतील अभियंते केवळ दैनंदिन कामकाज करणारे अधिकारी नसून, आपल्या कल्पकतेच्या आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचविण्याची क्षमता असलेले कुशल अभियंते आहेत, अशी प्रतिक्रिया रमेश भुतेकर यांनी दिली.
