scorecardresearch

कोटय़वधींची फसवणूक करणाऱ्या महिलेस अटक ;महिलेविरोधात आठ गुन्हे

तिच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत आठहून अधिक फसवणुकीचे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई : तीन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी परोमिता चक्रवर्ती नावाच्या एका महिलेस पवई पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत आठहून अधिक फसवणुकीचे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार संजय रोहिरा हे पवई परिसरात राहत असून त्यांची एक कंपनी आहे. त्यांचा कपडय़ांचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची सूरज जैस्वाल या व्यावसायिकाशी ओळख झाली होती. त्याचा भंगारमाल खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांना एक मोठी निविदा मिळणार होती. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे त्याचे घर तारण ठेवून ८१ लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते. काही महिन्यांत ही रक्कम देतो असे सांगून त्याने त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांचे पैसै परत केले नाही. त्याने दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते.

जानेवारी २०१४ रोजी सूरज हा परोमिता या महिलेबरोबर संजय यांच्याकडे आला होता. ती त्याची मानलेली बहीण असल्याचे सांगून तिची परपन ग्रूप नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले. तीच त्यांचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर तिने त्यांना सतरा लाखांचा एक धनादेश देऊन टप्याटप्याने आपण उर्वरित रक्कम परत करू सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होताच तिने पुढील दोन महिने त्यांना व्याज दिले होते. त्यामुळे त्यांनी सूरजच्या घराचे कागदपत्र तिला परत केले.

काही दिवसांनी तिने त्यांना दूरध्वनी करून तिच्याकडे प्राप्तिकर विभागाचा छापा पडला आहे. तिने दिलेल्या सतरा लाखांच्या हिशोबाबाबत विचारणा होऊ शकते. त्यामुळे तातडीने ही रक्कम तिच्या खात्यात परत करा असे सांगितले.

चौकशीच्या नावाने त्यांनी ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली. काही महिन्यानंतर तिने त्यांना पंधरा कोटीचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. या कर्जासाठी तिने त्यांच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट आणि व्याजासह एक कोटी ऐंशी लाख रुपये घेतले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात कायदेशीर कागदपत्रे तयार केली. मात्र तिने त्यातील अटी आणि शर्तीचे पालन न करता अस्तित्वात नसलेल बँकेचे द वेस्ट बंगाल स्टेट सहकारी बँक लिमिटेडचे अडीच कोटी रुपयांचे पाच पे ऑर्डर दिले होते.

ते पे ऑर्डर त्यांनी त्यांच्यात खात्यात जमा केल्यानंतर अशी कोणतीही बँक नसल्याचे त्यांना त्यांच्या बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारे परोमिता आणि सूरज यांनी बोगस दस्तावेज बनवून संजय रोहिरा यांची २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक केली. जानेवारी २०१९ रोजी संजय रोहिरा यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना परोमिता चक्रवर्ती हिला पोलिसांनी अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Powai police arrested woman in rs 3 crore fraud case zws